Mumbai Slum Migration Proposal: 'उद्धव ठाकरे आणि त्यांचा मुलगा मुंबईचे भवितव्य ठरवू शकत नाहीत'; 'झोपडपट्टी स्थलांतरण' प्रस्तावाला Aaditya Thackeray यांच्या टीकेला पियुष गोयल यांचे प्रत्युत्तर
पियुष गोयल

Mumbai Slum Migration Proposal: मुंबईत असे अनेक भाग आहेत जिथे मोठ्या प्रमाणात झोपडपट्ट्या आहेत. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लोक राहतात व त्यांचे व्यवसायदेखील याच परिसरात आहेत. मात्र आता मुंबई उत्तर मतदारसंघातील लोकसभेचे उमेदवार आणि केंद्रीय मंत्री पियुष गोयल (Piyush Goyal) यांनी या झोपडपट्ट्यांना किनारी भागात स्थलांतरित करण्याबाबत भाष्य केले आहे. गोयल यांनी केलेल्या वक्तव्याने राजकारण तापले आहे. पियुष गोयल यांच्या वक्तव्यानंतर शिवसेना (यूबीटी) नेते आदित्य ठाकरे यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. आदित्य ठाकरे म्हणाले की, झोपडपट्ट्या बळजबरीने हटवून मिठागराच्या जमिनीवर स्थलांतरित करण्याची योजना अत्यंत धोकादायक आहे.

एका मीडिया हाऊसला दिलेल्या मुलाखतीत पियुष गोयल म्हणाले होते की, आपण निवडून आल्यास हा मतदारसंघ पूर्णपणे स्वच्छ करणाऱ्या प्रकल्पावर काम करेन. या भागात मालाड, कांदिवली आणि बोरिवली या उत्तरेकडील उपनगरांचा समावेश होतो. पियुष गोयल यांनी झोपडपट्टी पुनर्वसनासाठी मुंबईतील मिठाच्या आच्छादित जमिनीचे पुनर्वितरण करण्याच्या कल्पनेचे स्वागत केले होते.

त्यानंतर यावर निशाणा साधत ही अतिशय धोकादायक योजना असल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले. झोपडपट्ट्यांमध्ये राहणाऱ्या लोकांचा उदरनिर्वाह आजूबाजूलाच असतो. त्यामुळे आम्ही त्यांना (भाजप) झोपडपट्ट्या अशा भागात स्थलांतरित करण्याच्या त्यांच्या योजनेला विरोध करू, असे ते म्हणाले. महाविकास आघाडीच्या काळात मंत्री राहिलेल्या आदित्य ठाकरे यांनी ‘भाजपचे धोरण गरिबी हटवण्याचे नसून गरीबांना हटवण्याचे आहे,' असा आरोप केला.

आदित्य ठाकरे म्हणाले की, एमव्हीए सरकारने मेट्रो रेल कारशेड प्रकल्पासाठी संबंधित जमीन (सॉल्ट पॅन लँड) मागितली असता, केंद्राने परवानगी देण्यास नकार दिला. आता याच जमिनीवर नागरिकांचे पुनर्वसन केले जात आहे.

ठाकरे यांच्या टीकेनंतर पियुष गोयल यांनी त्याला प्रत्युत्तर दिले आहे. ते म्हणाले, ‘उद्धव ठाकरे आणि त्यांचे सुपुत्र मुंबईचे भवितव्य ठरवू शकत नाहीत. हे शहर, या शहराला 'आपले घर' मानणाऱ्या प्रत्येकाची स्वप्ने आणि आकांक्षा टिकवून ठेवते. शहरातील झोपडपट्टी धारकांना चांगले, समृद्ध जीवन जगण्याचा अधिकार आहे. मुंबईला जगातील सर्वोत्तम शहरांपैकी एक बनवण्याच्या दृष्टीकोनाला विरोध करणे यातून ठाकरे पिता-पुत्रांची विकासविरोधी मानसिकता दिसून येते.’ (हेही वाचा: Lok Sabha Elections 2024: शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने जाहीर केली उमेदवारांची पहिली यादी; बारामतीतून सुप्रिया सुळे यांना उमेदवारी)

गोयल पुढे म्हणतात, ‘आमच्या धाडसी कल्पनांना आंधळा विरोध करणे आणि विकासाला घरोघरी पोहोचू न देणे ही लोकांना दडपण्याची आणि वंचित ठेवण्याची वृत्ती आहे. प्रत्येक झोपडपट्टी धारकाला चांगले घर देण्यासाठी आणि ते राहत असलेल्या ठिकाणी त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. उद्धवजींचे हताश, निराश, वैफल्यग्रस्त आणि भरकटलेले नेतृत्व दिशा देऊ शकत नाही तर फक्त समाजात तेढ निर्माण करू शकते.’