मुंबई (Mumbai) मधील सह्याद्री अतिथीगृहातील (Sahyadri Guest House) फाऊंटनचा स्लॅब अचानक कोसळल्याने एकच खळबळ उडाली. यातून पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) थोडक्यात बचावले आहेत. अचानक घडलेल्या या दुर्घटनेमुळे उपस्थित सर्वांचीच धावपळ झाली. मात्र यातून सर्वजण सुखरुप बाहेर पडल्याची माहिती समोर येत आहे. सह्याद्री अतिथीगृहातील हॉल क्रमांक 4 बाहेरील स्लॅब आज संध्याकाळच्या वेळेस कोसळला.
सह्याद्री अतिथीगृहात आदित्य ठाकरे यांची संध्याकाळी 4.45 वाजता बैठक सुरु होती. त्याचवेळेस बैठकीच्या खोलीबाहेर असलेले शोभेचे झुंबर पीओपी स्लॅबसह कोसळले. यात दुर्घटनेनंतर उपस्थित सर्वांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले. तर आदित्य ठाकरे देखील सुखरुप बाहेर पडले. विशेष म्हणजे या दुर्घटनेत कोणीही जखमी झाले नाही. मात्र दुर्घटना गंभीर असल्याने सह्याद्री अतिथीगृहातील सर्व सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.
स्लॅब कोसळलेल्या इमारतीचं बांधकाम 25 वर्षांपूर्वीचं आहे. मात्र या इमारतीचं स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आलेलं आहे. या संपूर्ण इमारतीचा अहवाल हाती आल्यानंतर प्रतिक्रीया देण्यात येणार असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. परंतु, दुरुस्तीचं काम तातडीने सुरु करण्यात येणार आहे.
यावर शिवसेनेच्या नेत्या निलम गोऱ्हे यांनी ट्विटच्या माध्यमातून प्रतिक्रीया दिली आहे. ही घटना फारच धक्कादायक व क्लेशदायक असल्याचे म्हटले आहे. सर्वजण सुखरुप बचावले हे चांगले असले तरी या बांधकामाची आणि घटनेची उच्चस्तरीय चौकशी करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
दरम्यान, सध्या मंत्री आदित्य ठाकरे राज्यातील कोरोनाची परिस्थिती आणि तिसऱ्या लाटेचा धोका याबाबतच्या उपाययोजनांसाठी बैठका घेत आहेत.