मुंबई: येत्या 14 फेब्रुवारी पासून सायन उड्डाणपुलाचे दुरुस्ती काम होणार सुरु
प्रतिकात्मtक फोटो (Photo Credits-Facebook)

मुंबईतील सीएसएमटी स्थानकातील पूल पडल्याची दुर्घटना झाल्यानंतर महापालिकेकडून याबाबत गंभीर दखल घेण्यात आली आहे. तसेच धोकादायक पुलांची पुर्नबांधणी किंवा दुरुस्तीची कामे लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. याच पार्श्वभुमीवर सायन (Sion) मधील उड्डाण पुलाच्या दुरुस्तीचे काम येत्या 14 फेब्रुवारीपासून सुरु करण्यात येणार आहे. या दरम्यान पुलाचे बेअरिंग बदलण्यात येणार असून हा पूल चार दिवस वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे.सायन उड्डाण पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट आयआयटी मुंबई यांच्या द्वारे करण्यात आले होते. त्यानुसार अहवालात पुलाचे बेअरिंग बदलण्यात येण्याची शिफारस करण्यात आली होती. तर गेल्या वर्षात मार्च महिन्यात सायन उड्डाण पुलाच्या प्लास्टरचा काही भाग कोसळल्याचा प्रकार समोर आला होता.

सायन उड्डाण पुलावरुन मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची ये-जा होत असते. त्यामुळे वाहतुकीच्या दृष्टीने उड्डाणपुलाचे महत्व लक्षात घेऊन त्याचे काम पूर्ण करण्याकडे आता लक्ष दिले जाणार आहे. या कामासाठी आठ ट्रॅफिक ब्लॉक घेण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच येत्या एप्रिल महिन्याच्या अखेरीस याचे काम पूर्ण होणार असल्याचा अंदाज एमएसआरडीसीने व्यक्त केला आहे. पुलाच्या दुरुस्ती कामासाठी 6 कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. पुलाच्या बेअरिंगचे काम पूर्ण झाल्यानंतर एक्सपानशन जॉइंट बदलण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे.(Mumbai Dangerous Bridge: नव्याने झालेल्या स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये आढळले 15 धोकादायक पूल; जाणून घ्या यादी)

पुलाचे काम आठवड्यातून चार दिवस करण्यात येणार असल्याने त्या दरम्यान ब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉकदरम्यान पुलाच्या खालील बाजूने वाहतुक वळवण्यात येणार आहे. गेल्या काही काळापासून पुलाच्या सुरक्षतेबाबतचा प्रश्न प्रवाशांकडून वारंवार उपस्थित केला जात होता. त्यानंतर आता अखेर या पुलाचे काम सुरु करण्यात येणार असून पुढील अडीच महिने काम चालणार आहे.