हल्ला (Photo Credits: IANS| Representational Image)

चुनाभट्टी (Chunabhatti) येथील कसाईवाडी येथे अवैध गोमांस (Illegal Beef) वाहून नेणाऱ्या ट्रकवर छापा टाकण्यासाठी पोलीस कर्मचाऱ्यांसह गेलेल्या दोन प्राणी कार्यकर्त्यांवर 40 हून अधिक माणसांच्या जमावाने हल्ला केला आहे. यामध्ये रॉडमुळे पशू कल्याण अधिकारी आशिष कमलाकर बारीक यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे, तर त्यांचे सहकारी प्रतीक ननावरे यांच्या पाठीवर काठीने हल्ला करण्यात आला. सोबत असलेल्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांना बाजूला ढकलण्यात आले, परंतु हल्लेखोरांनी त्यांना इजा केली नाही.

हल्ल्यानंतर बारीक यांना मध्य मुंबईतील सायन रुग्णालयात नेण्यात आले. ननावरे यांनी चुनाभटी पोलीस ठाण्यात जमावाविरुद्ध एफआयआर दाखल केला. TOI शी बोलताना ननावरे म्हणाले, 'एक ट्रक (MH03-CV7665) कसाईवाडीकडे अवैध गोमांस घेऊन जात असल्याची पूर्व माहिती आम्हाला मिळाली होती. त्यामुळे रविवारी सकाळी 6 च्या सुमारास, छापा टाकून गोमांस जप्त करण्यासाठी मदत मिळावी म्हणून आम्ही मुंबई पोलिसांच्या हेल्पलाइनवर कॉल केला. त्यावेळी दोन पोलीस अधिकारी त्यांच्या अधिकृत वाहनात आमच्यासोबत होते.' (हेही वाचा: Dindoshi Police Station: देशी बनावटीचे पिस्तूल आणि 3 जिवंत काडतसांसह एकास अटक- मुंबई पोलीस)

त्यांनी पुढे सांगितले की, गोमांस भरलेले वाहन कसाईवाडी, बडा मशिदीजवळ पोहोचताच 40 हून अधिक लोकांच्या संतप्त जमावाने त्यांच्यावर लाठ्या आणि रॉडने हल्ला केला. विशेषतः बारिक यांना जमावाने लक्ष्य केले आणि त्यामुळे त्यांच्या डोक्यातून रक्तस्त्राव सुरू झाला. सर्व हल्लेखोरांवर गुन्हा दाखल करण्यासाठी चुनाभट्टी पोलिसांकडे याबाबत तपशीलवार निवेदन सादर करण्यात आले आहे.

करुणा परिवार ट्रस्ट एनजीओचे ज्येष्ठ प्राणी कार्यकर्ते भावीन गठानी म्हणाले की, पोलिसांसमोर दोन कार्यकर्त्यांवर हल्ला ही एक अतिशय गंभीर बाब आहे. अशा संवेदनशील भागात छापे टाकताना तिथे हिंसाचार घडू शकतो, त्यामुळे पोलिसांनी अशावेळी मोठा फौजफाटा पाठवणे गरजेचे आहे. मी गोमांस विक्रेत्यांवर यापूर्वी 700 हून अधिक छापे टाकले आहेत आणि त्यामुळे वैयक्तिक सुरक्षा किती महत्त्वाची असते हे मला माहीत आहे.’