मुंबईमध्ये (Mumbai) काका आणि पुतणीच्या नात्याला काळीमा फासणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इथे विशेष POCSO न्यायालयाने नुकतीच एका 50 वर्षीय व्यक्तीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. या व्यक्तीवर त्याच्या पुतणीवर बलात्काराचा आरोप आहे. ही पिडीत मुलगी पुढील शिक्षण घेण्यासाठी त्यांच्या मूळ गावावरून या व्यक्तीच्या घरी राहायला आलेली होती. आरोपीने मुलीवर बलात्कार केला व त्यानंतर ती गर्भवती राहिल्यानंतर तिचा गर्भपात केला. याबद्दल न्यायालयाने त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. विशेष न्यायालयाने आरोपीला जास्तीत जास्त शिक्षा देताना त्याला कोणतीही सवलत देण्यास नकार दिला.
शिक्षेची सुनावणी करताना न्यायालयाने नोंदवले की, ‘आरोपी फिर्यादीचा नातेवाईक आहे. त्याने फिर्यादीशी लैंगिक संबंध ठेवले आणि तिच्यावर वारंवार बलात्कार केला. यामुळे मुलगी गर्भवती राहिल्यानंतर त्याने तिचा गर्भपात करवला. यामुळे सध्या मुलीला सीडब्ल्यूसी (CWC) शेल्टर होममध्ये राहावे लागत आहे.’
जुलै 2017 मध्ये दाखल झालेल्या फिर्यादीनुसार, पीडित मुलगी मूळची उत्तर प्रदेशची आहे. तिथेच तिचे सहावीपर्यंत शिक्षण झाले. त्यानंतर पुढील शिक्षणासाठी 2012 मध्ये ती मुंबईत राहायला आली आणि काका आणि त्याच्या कुटुंबासोबत राहू लागली. आरोपामध्ये तिने दावा केला की, काही वर्षांपूर्वी तिच्या काकांनी तिचा लैंगिक छळ करण्यास सुरुवात केली. जेव्हा ती घरात एकटी असायची तेव्हा ते तिला अयोग्यरित्या स्पर्श करायचे. तिने पुढे सांगितले की, मार्च 2017 मध्ये होळीनंतर आरोपीने तिच्यावर लैंगिक अत्याचार केले आणि कोणालाही काहीही न सांगण्याची धमकी दिली. त्यानंतर आरोपीने अनेकवेळा तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. (हेही वाचा: UP Crime: धक्कादायक! मौलानाचा मशिदीमध्ये दुष्कर्म, अल्पवयीन मुलीवर बलात्कार, आरोपीला अटक)
काही महिन्यांनंतर तिला पोटात दुखू लागले. वैद्यकीय तपासणीत ती गर्भवती असल्याचे समोर आले. त्यानंतर तिचा गर्भपात केला गेला. पुढे 10 जुलै 2017 रोजी तिच्या काकाविरुद्ध सहार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र आरोपीने हे आरोप फेटाळून लावले आणि त्यावेळी मुलगी अल्पवयीन नसल्याचे सांगितले. आरोपीने दावा केला की, एवढ्या मोठ्या कालावधीत मुलीला त्याच्या विरोधात आवाज उठवण्याची भरपूर संधी होती पण तिने तसे केले नाही. हे संबंध संमतीने असल्याचे त्याने सांगितले होते.