Mumbai Shocker: बक्षीस न दिल्याचा राग मनात ठेऊन तीन महिन्याच्या बालिकेला तृतीयपंथीयांनी जिवंत गाडले
प्रतिकात्मक फोटो (Photo Credits: Unsplash)

मुंबई (Mumbai) मध्ये तृतीयपंथीयांनी (Transgender) तीन महिन्याच्या बालिकेला जिवंत खाडीत गाडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मुंबईमधील कफ परेडच्या (Cuffe Parade) आंबेडकरनगर (Ambedkar Nagar) झोपडपट्टीत ही घटना घडली. 'आर्या' असे या मृत चिमुकलीचे नाव होते. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी तृतीयपंथी कन्नया उर्फ कन्नू चौघुले आणि साथीदार सोनू काळे या दोघांना अटक केली आहे. बक्षीस दिलं नसल्याचा राग मनात ठेऊन ही हत्या करण्यात आल्याचं समोर आलं आहे. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

कफ परेडच्या आंबेडकरनगर झोपडपट्टीत राहणाऱ्या सचिन चितकोटे यांना तीन महिन्यांपूर्वी कन्यारत्न झाले. घरात मुलं झाल्याचं कळाल्यानंतर परिसरात राहणारा तृतीयपंथी कन्हैया उर्फ कन्नू चौघुले हा सचिन यांच्या घरी आला. त्याने कुटुंबियांकडे एक साडी, नारळ आणि 1100 रुपयांची मागणी केली. मात्र लॉकडाऊनमुळे घरात सध्या पैशांची चणचण असल्याने दिवाळीत बक्षीस देतो असे त्यांनी सांगितले. याचा राग आल्याने कन्नू त्रागा करत तेथून निघून गेला. मात्र या गोष्टीचा राग मनात ठेऊन त्याने मुलीचे अपहरण केले. (Pune: पुण्यातील तृतीयपंथीयाचे खळबळजनक कृत्य, एका महिलेचे भररस्त्यात फाडले कपडे)

उकाड्यामुळे मुलीला गरम होऊ नये म्हणून चितकोटे कुटुंब घराचा दरवाजा उघडा ठेवून झोपत होते, याची माहिती कन्नूला मिळाली. याचाच फायदा घेत त्याने मध्यरात्री घरात घुसून मुलीचे अपहरण केले. यात त्याला सोनूने साथ दिली. दोघांनी चिमुकलीला कफपर्डच्या खाडीत जिवंत पुरले. रात्री अचानक जाग आल्यानंतर पाहिले असता मुलगी शेजारी नसल्याचे आई जोस्त्ना चितकोटे यांच्या लक्षात आले. त्यानंतर कुटुंबियांनी आर्याची शोधा शोध सुरू केली. घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले.

कन्नूवर संशय असल्याने पोलिस आणि चितकोटे कुटुंबिय कन्नूचा शोध घेत होते. हे समजताच कन्नूने स्वत:हून कफपरेड पोलिस ठाण्यात जावून गुन्हाची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी कन्नूला साथ देणाऱ्या सोनूला शोधून काढलं. पोलिसांनी या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करत अटक केली आहे.