ऑनलाइन गेमिंगचे व्यसन जगभर इतके वेगाने वाढत आहे की त्याचे अत्यंत घातक परिणाम होत आहेत. विशेषत: तरुण आणि किशोरवयीन मुले ऑनलाइन गेमिंगच्या व्यसनाचे बळी ठरत आहेत. असेच एक प्रकरण मुंबईत समोर आले आहे. ऑनलाइन गेमचे टास्क पूर्ण करण्यासाठी एका तरुणाने थेट समुद्रात उडी मारली. मुंबईतील 26 वर्षीय अल्ताफ हुसैन याने ऑनलाइन गेमिंगमधील एक टास्क पूर्ण करण्यासाठी मुंबईच्या वांद्रे-वरळी सी लिंकवरून समुद्रात उडी मारली आहे.
मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अल्ताफ हुसैन सतत ऑनलाइन गेम खेळत होता. जेव्हाही त्याला घरी आणि बाहेर वेळ मिळत असे, तेव्हा तो त्याच्या मित्रांसोबत ऑनलाइन पब्जी (PUBG) गेम खेळत असे. अहवालानुसार, या ऑनलाइन गेममध्ये एक टास्क पूर्ण करण्यासाठी तो मुंबईच्या वांद्रे-वरळी सी लिंकवर पोहोचला. तेथे त्याने आपले ओला वाहन थांबवून थेट समुद्रात उडी घेतली. त्यानंतर अल्ताफ हुसेन याचा समुद्रात बुडून मृत्यू झाला.
अल्ताफ हुसेन हा ओला चालक होता आणि तो मुंबईत आपल्या मित्र आणि भावांसोबत राहत होता. पोलिसांना काल संध्याकाळी अल्ताफ हुसेनचा मृतदेह ताब्यात घेतला. माहितीनुसार, काल रात्री 1 वाजण्याच्या सुमारास पोलिसांना मदतीसाठी कॉल आला. पोलीस जेव्हा घटनास्थळी पोहोचले तेव्हा त्यांना आढळले की, एका व्यक्तीने आपली कार पार्क केली आहे आणि कारमधून बाहेर पडून त्याने समुद्रात उडी मारली आहे. (हेही वाचा; Dhule Shocker: हत्या की आत्महत्या? धुळ्यात दिल्लीच्या बुरारीसारखी घटना; घरात सापडले एकाच कुटुंबातील 4 जणांचे मृतदेह, तपास सुरु)
त्यानंतर पोलिसांनी व्यक्तीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला मात्र, रात्रीचा अंधार आणि समुद्राच्या उंच लाटा यामुळे मृतदेह सापडला नाही. नंतर वरळी पोलीस ठाण्याला सकाळी साडेसात वाजता माहिती मिळाली की, सी लिंकवरून उडी मारलेल्या व्यक्तीचा मृतदेह दादर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सापडला आहे. त्यानंतर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला आणि पुढील कारवाईसाठी तो नायर रुग्णालयात पाठवण्यात आला. त्या ठिकाणी त्याला मृत घोषित करण्यात आले.