प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: PTI)

मुंबई मध्ये मंगळवार 10 मे दिवशी एका 22 वर्षीय तरूणाला आपल्या पत्नीची हत्या केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. ही घटना साकीनाका परिसरातील आहे. दरम्यान पोलिसांनी आरोपीच्या नखात सुकलेल्या रक्ताच्या डागांच्या आधारे हत्येचा सुगावा लावण्यास सुरूवात केल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.

आरोपीचं नाव मनोज प्रजापती आहे. मनोज आपली पत्नी रीमा भोला यादव पासून मागील 2 दिवसांपासून वेगळा राहत होता रीमाच्या मित्राला तिचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला. रोहित रविदास हा रीमाच्या मित्राने पोलिसांना खूनाची माहिती दिली. रोहित खैरानी रोड वर शिलाई काम करतो. रीमाशी त्याची ओळख महिन्याभरापूर्वीची आहे. पतीपासून वेगळी झालेली रीमा रोहित सोबत काम करत होती त्यामधून त्यांची ओळख झाली. मागील 10 दिवसांपासून रीमाकडे काम नसल्याने रोहितच तिला जेवण देत होता. नेहमीप्रमाणे 9 मेच्या रात्री जेव्हा तो तिला जेवण द्यायला गेला तेव्हा रीमा रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसली. नक्की वाचा: Nagpur Shocker: पत्नीसह मुलीची गळा चिरून हत्या केल्यानंतर पतीने गळफास घेत संपवलं जीवन .

रीमाचा गळा फिरून तिची हत्या करण्यात आली. पोलिसांनी या खूनाचा तपास सुरू केला. दरम्यान मनोजच्या नखांत पोलिसांना रक्त दिसलं. त्यावरून त्यांनी प्रश्नांची सरबत्ती सुरू केली. सुरूवातीला मनोजने पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनीही आपला खाक्या दाखवल्यानंतर मनोजने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. मृत्यूच्या आदल्या रात्री त्यांचे फोनवर बोलणं झाल्याचंही पोलिसांनी सांगितलं आहे.

खूनाच्या वेळेस वापरण्यात आलेला सुरा पोलिसांनी हस्तगत केला आहे. दरम्यान साकिनाका पोलिस स्टेशन मध्ये मनोज वर खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.