
मुंबईच्या Mumbai) वांद्रे (Bandra) परिसरातून एका 64 वर्षीय वृद्ध महिलेच्या हत्येची खळबळजनक घटना समोर आली आहे. यामागे चोरी हे कारण असल्याचे समजत आहे. काही दिवसांपूर्वी अभिनेता सैफ अली खानवरही एका चोराने हल्ला केला होता. आता वांद्रे परिसरात वृद्ध महिलेची हत्या करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे आणि महिलेच्या ओळखीच्या आणि जवळच राहणाऱ्या एका पुरूषाला अटक केली आहे. प्राथमिक चौकशीत असे दिसून आले आहे की, घरातून मौल्यवान वस्तू गहाळ झाल्याची नोंद आहे. त्यामुळे ही हत्या दरोड्याच्या उद्देशाने करण्यात आली होती असे समोर आले आहे.
रेखा अशोक खोंडे असे मृत महिलेचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रेक्लेमेशन गेट क्रमांक 2 जवळ असलेल्या रेखा यांच्या अपार्टमेंटमधून दुर्गंधी येत असल्याची माहिती मंगळवारी सकाळी मिळाली. दुसरीकडे यानंतर शेजाऱ्यांनी माहीममध्ये राहणाऱ्या रेखा यांच्या मुलीशीही संपर्क साधला. ती तिथे पोहोचली आणि दार उघडले तेव्हा तिच्या आईचा अर्धकुजलेला मृतदेह आढळला. महिलेचे हात दुपट्ट्याने बांधलेले होते आणि तिच्या गळ्यावर धारदार वस्तूने हल्ला केल्याने जखमा झाल्या होत्या.
पोलीस घटनास्थळी पोहोचल्यानंतर त्यांनी मृतदेह पोस्टमॉर्टेमसाठी भाभा रुग्णालयात पाठवला. एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, रेखा यांची हत्या तीन-चार दिवसांपूर्वी झाली असावी असा अंदाज आहे. त्या एकट्या राहत होत्या व त्यांची मुलगी अनेकदा त्यांना भेटायला येत असे. याबाबत वांद्रे पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला. गुन्ह्याची माहिती मिळताच, झोनल डीसीपी दीक्षित गेडाम यांनी या प्रकरणाचा तपास करण्यासाठी अनेक पथके तयार केली. (हेही वाचा: Pune Crime: वारजेत दुचाकास्वाराची दोघांकडून लुटमार; पोलिसांचीही तक्रार दाखल करण्यास दिरंगाई)
वरिष्ठ निरीक्षक संजय मराठे आणि निरीक्षक अजय लिंगनूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस्न पथकांना इमारतीबाहेरील सीसीटीव्हीमधून ठोस धागेदोरे सापडले आणि तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपी शरीफ शेख याला अटक केली. पोलिसांनी सांगितले की त्याने घरातून दागिने लुटले होते. त्याला मंगळवारी न्यायालयात हजर केले जाणार होते. दरम्यान, गेल्या महिन्यात, एका चोराने अभिनेता सैफ अली खानच्या वांद्रे येथील घरात चोरीच्या उद्देशाने घुसखोरी केली. दरोड्याच्या अयशस्वी प्रयत्नादरम्यान, चोराने घटनास्थळावरून पळून जाण्यापूर्वी अभिनेत्याला गंभीर दुखापत केल्याचा आरोप आहे.