मुंबई (Mumbai) मध्ये आग्रिपाडा पोलिसांनी (Agripada Police) रविवारी एका 27 वर्षीय तरूणाला अटक केली आहे. या मुलावर 15 वर्षीय मुलीसोबत लग्न केल्याचे आणि तिच्यावर वारंवार बलात्कार केल्याचे आरोप करण्यात आले आहेत. पोलिसांनी पीडित मुलीच्या आईला आणि मुलाच्या पालकांनाही ताब्यात घेतले आहे. त्यांनी या विवाहाला मान्यता देण्यावरून त्यांनाही ताब्यात घेण्यात आले आहे. Child Marriage Act 2006 आणि पोक्सो अंतर्गत कारवाई करताना पतीला पोलिसांनी अटक केली आहे.
इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, जानेवारी महिन्यात मध्य मुंबईतील एका भागात लग्न पार पडलं. मात्र हा प्रकार आता उजेडात आला आहे. या अल्पवयीन मुलीने जे जे हॉस्पिटल मध्ये बाळाला जन्म दिला आहे. प्रसुतीपूर्वी जेव्हा 'वय' विचारण्यात आलं होतं तेव्हा त्यांनी मुलीचं वय 20 वर्ष असल्याचं सांगितलं होतं. बाळाचं बर्थ सर्टिफिकेट बनवण्यासाठी जेव्हा आईचं आधार कार्ड विचारण्यात आलं तेव्हा तिचा जन्म जून 2006 चा असल्याचं समोर आलं आहे. डॉक्टरांनी हा प्रकार समोर येताच आग्रिपाडा पोलिसांना त्याची माहिती दिली आहे.
आर्थिक परिस्थिती बिकट झाल्याने पीडिताच्या आईने तिचं शिक्षण थांबवून लग्न लावून दिले. मुलगी पाचवी पर्यंतच शिकली आहे. पतीला आणि कुटुंबियांना मुलगी अल्पवयीन असल्याचं ठाऊक असुनही लग्न केल्याने त्यांच्यावरही पोलिस कारवाई करण्यात आली आहे. नक्की वाचा: Mumbai: चार वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार; वृद्ध दांपत्यास 10 वर्षांची कठोर शिक्षा .
लग्नानंतर शिवडी मध्ये ती रहायला आल्यानंतर तिच्यावर पतीकडून अनेकदा बलात्कार झाले. दरम्यान मुलगी गर्भवती झाल्याचं समजल्यानंतर तिच्या उपचारासाठी, चेक अपसाठी तिला अनेकदा हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले पण ती अल्पवयीय असल्याचं प्रत्येकवेळी लपवण्यात आलं. सध्या आरोपीला 24 डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी ठोठावण्यात आली आहे.