नागरिकत्व सुधारणा कायदा (CAA) महाराष्ट्रात लागू करणार नसल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी जाहिर केले. त्यानंतर भाजप आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी उद्धव ठाकरे यांच्या निर्णयावर घणाघाती टीका केली आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी आशिष शेलार यांच्या विरोधातील वादग्रस्त होर्डिंग्स मुंबईतील रस्त्यांवर झळकावले आहेत. हे होर्डिंग्स भाजप प्रदेश कार्यालय आणि भाजप नेते राज पुरोहित कार्यालयासमोर लावले आहेत. यामुळे आता शिवसेना विरुद्ध भाजप असा वाद रस्त्यावर उफाळून येत असल्याचे दिसून येत आहे.
शिवसैनिकांना झळकवलेल्या होर्डिंग्सवर आशिष शेलार हे फाटक्या कपड्यांमध्ये दिसून येत आहेत. तसेच 'आ' शिषे मे देश आणि राजकरणातील हि... असे वादग्रस्त विधान सुद्धा लिहिले आहे. मात्र आता हे होर्डिंग्स हटवण्यात आले आहेत. नालासोपारा येथील कार्यक्रमात आशिष शेलार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात आक्षेपार्ह विधान केल्याने हा वाद वाढला आहे.(CAA Fights: आम्ही बाप शोधायला गुजरात ला जात नाही! जितेंद्र आव्हाड यांचा आशिष शेलार यांच्यावर घणाघाती हल्ला)
वास्तविक उद्धव ठाकरे यांनी एनआरसीच्या मुद्द्यावरून बोलताना "नागरिकत्व सिद्ध कारण हे केवळ मुस्लिमांना नाही तर हिंदूंना देखील कठीण आहे असे म्हणत आपण काहीही झालं तर महाराष्ट्रात NRC लागू होऊ देणार नाही अशी भूमिका मांडली होती. ज्यावर आशिष शेलार यांनी कायदा लागू न होऊ द्यायला हे काय मुख्यमंत्र्यांच्या बापाचं राज्य आहे का? या शब्दात टीका केली होती. यावर जयंत पाटील यांनी सुद्धा भाजपने बाप काढण्याच्या इतक्या खालच्या पातळीवर जाण्याची आवश्यकता नाही कारण ज्यांचा बाप काढत आहेत त्यांनी मनात आणलं तर मुंबईत फिरणं सुद्धा अशक्य होईल असा इशारा शेलार यांना दिला होता