Mumbai Rains: मुंबई मध्ये सकाळपासून जोरदार पावसाला सुरुवात; पुढील 2 दिवस जोर कायम राहण्याची शक्यता
Image For Representation (Photo Credits: PTI)

आज सकाळपासूनच मुंबईच्या (Mumbai) मध्य आणि पश्चिम उपगनरांमध्ये पावसाने दमदार हजेरी लावली. मुंबईत 15 जुलै रोजी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली होती. त्यानुसार आज सकाळपासूनच जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. दरम्यान मुसळधार पावसामुळे मच्छिमारांनाही समुद्रात न जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसंच  हवामान खात्याकडून मुंबईसाठी ऑरेंज अलर्टही (Orange Alert) जारी करण्यात आला आहे. मुंबईत कालपासूनच जोरदार पावसाने हजेरी लावली होती. त्यानंतर आजही मुसळधार पाऊस बरसत असून पावसाचा जोर पुढील 24 तास कायम राहण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. (मुंबई, ठाणे, पालघर येथे आज मुसळधार पावसाची शक्यता; हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट जारी)

मुंबईत जुलै महिन्यात 840.7mm इतका पाऊस पडणे अपेक्षित असून जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सुमारे 506.4 mm इतक्या पावसाची नोंद झाली आहे. हा पाऊस जुलै महिन्यात अपेक्षित असलेल्या पाऊसाइतका आहे. दरम्यान गेल्या 24 तासांत डहाणू 128 mm, कुलाबा 121.6 mm सांताक्रुज‌ 96.6 mm, रत्नागिरी 101.3 mi अलिबाग 122.6 mi इथे इतक्या पावसाची नोंद झाली आहे. पुढील 2 दिवस महत्त्वाचे असल्याने काळजी घ्या असे आवाहन मुंबई हवामान विभागाचे उपमहासंचालक (Dy Director General of Meteorology) के.एस.होसाळीकर (K S Hosalikar) यांनी केले आहे.

K S Hosalikar Tweet:

मुंबईसह ठाणे, पालघर या भागांतही मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसंच कोकण किनारपट्टीवरील जिल्ह्यांनाही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. रायगड, रत्नागिरी  आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्येही मुसळधार पावसाची शक्यता असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे या भागातही हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट (Orange Alert) जारी केला आहे.