Mumbai Rains | (Photo Credit- X)

भारतीय हवामान विभागाने (IMD) मुंबईसाठी रेड अलर्ट (Mumbai Rains Red Alert) जारी केला आहे. 27 मे 2025 रोजी सकाळी 8:30 वाजेपर्यंत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. सोमवारपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईतील (Mumbai Weather Forecast) जनजीवन विस्कळीत झाले असून अनेक भागांत पाणी साचले (Waterlogging in Mumbai) आहे. पावसाची संततधार अद्यापही सुरुच असून, त्याचा वाहतूक आणि जनजीवन विस्कळीत होण्यावर परिणाम झाला आहे. संभाव्य पर्जन्यवृष्टीचा इशारा विचारात घेता आयएमडीने नागरिकांना सतर्क राहण्याचे अवाहन केले आहे. मुंबई महानगरपालिकेने आपल्या सोशल मीडिया (X) मंचावरुन आयएमडीने वर्तवलेला हवामान अंदाज सामायिक केला आहे.

रेड अलर्ट म्हणजे काय?

हवामान विभागाचा रेड अलर्ट म्हणजे सर्वात तीव्र हवामान इशारा, ज्याचा अर्थ अतिशय जास्त पर्जन्यवृष्टी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहणे गरजेचे आहे. विशेषतः सखल भागांतील रहिवाशांनी खबरदारी घ्यावी. (हेही वाचा, Mumbai Local Train Delayed: मुसळधार पावसामुळे लोकलचा वेग मंदावला; उपनगरीय गाड्या 8-10 मिनिटे उशिराने धावणार)

अंधेरी, दादर, भायखळा, चर्चगेटसह उपनगरात पाणी साचले

मुंबईतील अंधेरी, दादर, भायखळा, चर्चगेट आणि उपनगरातील अनेक भागांत पाणी साचल्याचे प्रकार समोर आले आहेत. यामुळे वाहतूक कोंडी झाली असून लोकल ट्रेन सेवाही विस्कळीत झाली आहे. केईएम रुग्णालयात पाणी शिरल्याने, ग्राउंड फ्लोअरवरील बाल रुग्णांसाठीचा अतिदक्षता विभाग (PICU) प्रभावित झाला आहे.

रायगड, पालघर, ठाण्यासह इतर जिल्ह्यांनाही रेड अलर्ट

मुंबईसह रायगड, पालघर, ठाणे आणि इतर जवळच्या जिल्ह्यांसाठीही रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. हवामान खात्याने अधिकृत X अकाउंटवरुन याची माहिती दिली असून सतत निरीक्षण ठेवले जात आहे.

बीएमसीकडून ताजी माहिती जारी

नागरिकांसाठी प्रशासनाची महत्त्वाची सूचना

प्रशासन आणि हवामान खात्याने सर्व नागरिकांना पुढील सूचना दिल्या आहेत:

  • शक्यतो घरातच थांबा, अनावश्यक प्रवास टाळा
  • स्थानिक प्रशासनाकडून दिलेल्या सुरक्षा सूचना पाळा
  • आपत्कालीन संपर्क क्रमांक जवळ ठेवा
  • फक्त अधिकृत माध्यमांद्वारेच अपडेट घ्या
  • प्रशासन सतर्क; नागरिकांनी सहकार्य करावे

मुंबई शहरांसह उपनगरांमध्ये 27 मे सकाळपर्यंत रेड अलर्ट लागू असल्याने, आपत्कालीन सेवा आणि महानगरपालिका यंत्रणा सतर्क आहेत. नागरिकांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून प्रशासनास सहकार्य करावे आणि सुरक्षित राहावे. नागरी संस्था आणि आपत्कालीन पथके उच्च सतर्क आहेत. सध्याच्या तीव्र हवामान परिस्थितीचा परिणाम कमी करण्यासाठी अधिकारी काम करत असताना नागरिकांना सतर्क राहण्याची आणि सहकार्य करण्याची विनंती बीएमसीने केली आहे.