Mumbai Rains & Maharashtra Monsoon Update: बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा; मुंबई, पालघर, ठाणे जिल्ह्यात अलर्ट, जाणून घ्या महाराष्ट्रातील पावसाचा अंदाज
Rains (Photo Credits: ANI)

महाराष्ट्रात दमदार सुरुवात करुन मध्येच गायब झालेला मान्सून (Monsoon 2021) आजपासून (मंगळवार, 13 जुलै) पुन्हा सक्रीय झाला आहे. हवामान विभागानेही (Weather Forecast in Maharashtra) तसा अंदाज वर्तवला आहे. या अंदाजानुसार, बंगालच्या उपसागरात (Bay of Bengal) सध्या कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. त्यामुळे मुंबई, पुण्यासह कोकण, मराठवाडा आणि विदर्भातही पाऊस चांगलाच बरसणार असे चित्र आहे. सकाळपासून मुंबई, ठाणे, रायगड आणि महाराष्ट्रातील विविध ठिकाणी पावसाला जोरदार सुरुवात झाली आहे. हवामान विभागाने मुंबई, ठाणे, पालघरसह सात जिल्ह्यांमध्ये मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली (Weather Forecast in Maharashtra) आहे. या सर्व जिल्ह्यांमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

राज्याच्या कोकण विभागात दमदार पाऊस कोसळत असून सर्वत्र दाणादाण उडाल्याचे पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी पाठिमागील 24 तासात तब्बल 250 ते 350 मिलिमीटर पावसांची नोंद झाली आहे. त्यामुळे सर्वत्र नद्या, नाले, ओढे असंडून वाहात असताना दिसत आहेत. पश्चिम महाराष्ट्रात महाबळेश्वर येथेही मुसळधार पाऊस पडतो आहे. मराठवाड्यात परभणी येथे विक्रमी पाऊस पडला आहे. मराठवाड्याच्या परभणी येथे पाठिमागील 24 तासात 232 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. हा पाठिमागील अनेक वर्षांतला उच्चांक आहे.  (हेही वाचा, IMD Monsoon Prediction: मान्सून यंदा पूरेपूर बरसणार! सरासरीच्या 101% पर्जन्यवृष्टीची शक्याता- हवामान विभाग)

राज्यात सक्रीय झालेला मान्सून पुढील काही दिवस कायम राहणार आहे, त्यामुळे राज्यातील नागरिकांनी सतर्कता बाळगावी असे हवामान विभागाने म्हटले आहे. हवामान विभागाने म्हटले आहे की, मुंबई, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, औरंगाबाद या सात जिल्ह्यांमध्ये पुढील साधारण तीन तास अती मुसळधार पाऊस पडू शकतो.

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. परिणामी पर्जन्यवृष्टीस पुरक स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे विदर्भ, मराठवाडा आणि परिसरात पर्जन्यवृष्टी होत आहे. मध्य महाराष्ट्र, कोकण आणि मराठवाड्यातही पुढचे चार-पाच दिवस काही ठिकाणी जोरदार पाऊस पाहायला मिळू शकतो. तर विदर्भात पावसाच्या तुरळक सरी पडताना दिसतील.

के एस होसाळीकर ट्विट

हवामान विभागाने पुढील तीन दिवसांसाठी पावसाचा अंदाज वर्तवला आहे. त्यानुसार 13 जुलै रोजी पुणे जिल्हा घाटक्षेत्र, औरंगाबाद, जालना जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता आहे तर रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा आदी जिल्ह्य़ांत तुरळक पाऊस पडेल. 14 जुलै रोजी परभणी, हिंगोली, नांदेड हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस अपेक्षीत आहे तर मुंबई, पालघर, ठाणे, कोल्हापूर, सातारा, पुणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जोरदार पावसाची हजेरी पाहायला मिळेल. 15 जुलै रोजी मुंबई, ठणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर, पुणे आदी जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो.