Mumbai Rains: मुंबईमध्ये पुढील तीन तासात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडणार; नवी मुंबई, विलेपार्ले, गोरगाव भागात पावसाची हजेरी
Rains | File image | (Photo Credits: PTI)

आयएमडीच्या म्हणण्यानुसार, 16 ते 18 फेब्रुवारीदरम्यान विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रासह मुंबई (Mumbai) व ठाणे परिसरात पाऊस (Rain) पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. आयएमडीच्या मते, राज्यातील बर्‍याच भागात वादळासह विजांच्या कडकडाटाचा धोका आहे. आता मध्य महाराष्ट्र व मुंबईमध्ये पावसाने जोरदार मुसंडी मारली आहे. पुढील तीन तासात मुंबईमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडणार आहे. मुंबईच्या विले पार्ले, गोरेगाव परिसरात पाऊस पडायला सुरुवात झाली आहे. यासह नवी मुंबईमध्येही अनेक ठिकाणी गेला अर्धा तास पाऊस पडत आहे.

प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई यांनी दिलेल्या माहितीनुसार, रत्नागिरी, ठाणे, रायगड, पालघर, नाशिक, धुळे, अहमदनगर, पुणे, सांगली आणि सातारा जिल्ह्यात पुढील ते 3 ते 4 तासांत वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. वेगळ्या ठिकाणी गारपिटीची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाने याआधीही राज्यात पावसाचा अंदाज वर्तवला होता. त्या अंदाजानुसार, कालपासून राज्याच्या काही भागात वादळी वाऱ्यासह पाऊस पडतोय. आज संध्याकाळी पुणे, सातारा जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली. (हेही वाचा: Rain in Maharashtra: विजांचा कडकडाट, वादळ वारा, त्यात जलधारा; महाराष्ट्राला अवकाळी पावसाचा फटका)

यासह परभणी, कोल्हापूर, सातारा, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यात 17 आणि 18 फेब्रुवारी दरम्यान पावसाचा इशारा दिला आहे. त्याचबरोबर पुणे, बीड, जालना, औरंगाबाद, अहमदनगर, धुळे आणि जळगाव येथे 19 फेब्रुवारीला पावसामुळे सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

 

हवामान खात्याने या काळात महाराष्ट्राच्या बर्‍याच भागात तापमानात घट होईल असे सांगितले आहे. अशा प्रकारे गेले तीन दिवस कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाने हजेरी लावली आहे.