
मुंबई मध्ये आज मान्सून 2021 चं आगमन झालं आहे. पहिलाच पाऊस रेकॉर्डब्रेक झाल्याने आज हिंदमाता, सायन, चेंबूर भागामधील सखल ठिकाणी पाणी साचल्याचं चित्र आहे. हिंदमाता परिसरात सुमारच्या सुमारास गुडघ्याभर पाणी होतं तर सायन, चुनाभट्टी परिसरात रेल्वे ट्रॅक पाण्याखाली गेले आहेत. यामुळे वाहतूक सेवा मंद गतीने शहरात सुरू आहे. मुंबईचा आढावा घेण्यासाठी आज बीएमसी पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल आणि महापौर किशोरी पेडणेकर रस्त्यावर उतरलेल्या पहायला मिळाल्या. त्यावेळेस मीडियाशी बोलताना पालिकेकडून हिंदमाता परिसरात पालिका एक भूमिगत प्रकल्प राबवत आहे ज्यामुळे 30 दिवसांनंतर पुन्हा असा पाऊस पडल्यास पाणी साचण्याचं प्रमाण कमी होईल असा दावा त्यांनी केलं आहे.
दरम्यान आज इक्बाल सिंह चहल यांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंदमाता परिसरात 4 फूट उंचीचे एलिव्हेडेट रोड तयार करण्यात आले आहेत. परिणामी पूर्वीप्रमाणे ट्राफिक थांबवण्याची वेळ आलेली नाही. तर हिंदमातामध्ये सध्या 140 कोटींचा भूमिगत प्रकल्पाचं काम सुरू आहे. यामुळे हिंदमातामध्ये पाणी साचण्याचे प्रमाण कमी होण्यास मदत होणार आहे. यामध्ये दीड किलोमीटरची पाईपलाईन टाकली जात आहे. केंद्र सरकारकडून दहा दिवसांपुर्वी या प्रकल्पाला मान्यता मिळाल्याने पावसाळ्यापूर्वी काम पूर्ण झालं नाही. पण येत्या महिन्याभरात हा प्रकल्प पुर्ण करण्यात येणार आहे. यामुळे जुलै, ऑगस्ट 2021 मध्ये असा पाऊस पडला तरीही हिंदमाता परिसरामध्ये पाणी साचणार नाही अशी माहिती आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी दिली आहे.
सध्याची क्षमता पाहता हिंदमाता परिसराची भौगोलिक रचना पाहता 30 मिली पाऊस पडला तरीही हिंदमाता परिसर तुंबतो. या भागात पूर्ण नालेसफाई झाली तरीही पाणी पुढे जाऊच शकत नसल्याने ते साचून राहतं आणि आता याच पाण्याचा निचरा करण्यासाठी भूमिगत पाईपलाईन टाकण्याचं काम पालिकेने हाती घेतलं आहे. Mumbai Traffic Updates: मान्सूनच्या पहिल्याच दमदार पावसानंतर सखल भागात पाणीच पाणी; पहा मुंबई लोकल, बेस्ट बस सेवेतील सध्याचे बदल!
अंधेरी सबवे अजून 2 वर्ष पावसाळ्यात बंद
हिंदमाता प्रमाणे अंधेरी सब वे देखील महत्त्वाचा भाग आहे. अंधेरी सबवेसाठी कायमचा उपाय म्हणून मोगरा पंम्पिंग स्टेशनवर काम करण्यात येत आहे. पंम्पिंग स्टेशनच्या कामाला 2 वर्षांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे 2 वर्ष अजून पावसाळ्याच्या दिवसात सबवे बंद ठेवला जाईल असे देखील त्यांनी स्पष्ट केले आहे.
दरम्यान आज सकाळी मीडीयाशी बोलताना आम्ही पाणी साचणारचं नाही असा दावा केला नसल्याचे महापौरांनी स्पष्ट केले आहे. तसेच रेल्वे ट्रॅक सफाईच्या कामात रेल्वे प्रशासनाकडून अपेक्षित मदत मिळत नसल्याचेही त्यांनी बोलून दाखवले आहे.