Mumbai Rain Updates: पहिल्याच पावसात मुंबई तुंबली, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून वरळी येथील कोस्टल रोडला भेट देऊन पाहणी (Watch Video)
Eknath Shinde | (Photo Credits: Twitter/ ANI)

CM Eknath Shinde Visited Waterlogging Area In Mumbai: पावसाने मुंबईत दमदार हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे. मुंबईत पावसाने जवळपास 14 दिवस उशीराने हजेरी लावली. पाठिमागील प्रदीर्घ काळ प्रतिक्षेत असलेला मुंबईकर काहीसा सुखावला. पण, असे असले तरी पहिल्याच पावसाने मुंबईची दैना दैना उडवली. ज्यामुळे मुंबईतील पावसाळापूर्व कामांची पोलखोल झाली. अनेक ठिकाणी पाणी तुंबल्याने तळे साचल्याचे पाहायला मिळाले. ज्याचा परिणाम वाहतुकीवर झाला. दरम्यान, मुंबईत पाणी साचल्याच्या बातम्या प्रसारमाध्यमांतून आल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईतील अनेक ठिकाणांना भेटी दिल्या. त्यांनी भेट देऊन पाणी साचलेल्या भागाची पाहणी केली. त्यानंतर संबंधीत पालिका अधिकाऱ्यांना काही सुचना केल्या.

पाणी साचलेल्या ठिकाणांना मुख्यमंत्र्यांची भेट

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईतील वरळी येथील कोस्टल रोडला भेट देऊन येथील परिस्थितीची पाहणी केली. पाणी साचण्याच्या कारणांची माहिती घेतली. पाणी तुंबणार नाही याची काळजी घेण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. त्यांनी माटुंगा येथेही पाहणी केली. मिलन सबवेलाही भेट दिली. त्यानंतर त्यांनी पालिकेच्या संबंधित विभागांचा आढावा घेतला. तसेच, पाणी उपसा करणारी यंत्रणा सक्रीय करा आणि जास्तत जास्त कमी वेळात पाणीउपसा कसा होईल, याकडे लक्ष द्या अशासूचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना केल्या. (हेही वाचा, Mumbai Rain Update: पुढील 24 तासांमध्ये मुंबईत मुसळधार पावसाची शक्यता; IMD ने वर्तवला ऑरेंज अलर्टचा अंदाज)

मुसळधार पावसाची शक्यता

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पाठिमागील 24 तासात मुंबई शहरात 104 मिमी, पूर्व उपनगरांमध्ये 123 मिमी तर पश्चिम उपनगरात 139 मिमी इतका पाऊस झाला आहे. शहरात आणि उपनगरांमध्ये वातावरण ढगाळअसून आज दिवसभरातही मुसळधार पावसाची शक्यता, हवामान विभागाने वर्तवली आहे.

व्हिडिओ

मुंबईत पावसाचा जोर वाढला असल्याने सखल भागात पाणी साचू लागले आहे. पावसाने मधे मधे विश्रांती घेतली की या पाण्याचा निचरा होत आहे. मात्र, पाऊस संततधार राहिल्यास पाणी साचण्याचा वेग वाढतो आणि वाहतूक ठप्प होते. मुंबई उपनगरात झालेल्या मुसळधार पावसामुळे दहिसर पूर्वेकडील पश्चिम द्रुतगती महामार्ग जवळील सुहासिनी पावसकर सबवे परिसरात पाणी साचले होते. शिवाय अंधेरी सबवे परिसरातही पाणी साचल्याने वाहतूक काही काळ ठप्प होती.