Fly Blade Helicopter | Photo credit :Twitter

साईबाबांची शिर्डी (Shirdi) हे अवघ्या महाराष्ट्राचे श्रद्धास्थान. मुंबई-पुण्याहून (Mumbai-Pune) दरवर्षी हजरो भाविक शिर्डीला भेट देतात. दोन्ही ठिकाणाहून रस्ते मार्गे साधारण 5 तासांमध्ये शिर्डीला पोहचता येते. मात्र आता हा प्रवास अवघ्या 50 मिनिटांमध्ये होईल असे सांगितले तर? विश्वास बसत नाही ना, मात्र हे खरे आहे. आता मुंबई आणि पुणे या दोन्ही शहरांतून अमेरिकन कंपनी फ्लाय ब्लेड (Fly Blade) ने शिर्डीसाठी हेलिकॉप्टर सेवा (Helicopter Service) सुरु केली आहे.

कंपनीने पुणे-शिर्डी, पुणे-मुंबई व मुंबई-शिर्डी अशा तीन मार्गांवर आपली हेलिकॉप्टर सेवा सुरु केली आहे. पुण्यातील केशवनगर भागात कंपनीने आपले हेलीपॅड उभे केले आहे. तिथून 40-45 मिनिटांमध्ये शिर्डी व मुंबईचा प्रवास शक्य झाला आहे.

पुण्याहून मुंबईला येणारे प्रवासी अगदी जुहू व महालक्ष्मी पर्यंत प्रवास करू शकतात. ब्लेडच्या वेबसाईटवर नमूद केल्याप्रमाणे पुणे ते शिर्डी, व पुणे-मुंबई या प्रवासाचे भाडे 15,600 इतके आहे. तर मुंबई-शिर्डी प्रवासासाठी 16,000 प्रतीव्यक्ती इतका दर आकारला जात आहे. पुणे-शिर्डी असा प्रवस केलेल्या एका प्रवाशाने दिलेल्या माहितीनुसार, हा प्रवास अतिशय आरामदायी आणि सुखकर होता. ट्राफिकच्या कोणत्याही अडथळ्याशिवाय अवघ्या 50 मिनिटांमध्ये हा प्रवास घडला.

(हेही वाचा: पायलट होण्याचे स्वप्न पूर्ण न झाल्याने 'या' व्यक्तीने चक्क टाटा नॅनो ला दिला हेलिकॉप्टरचा लूक; पहा व्हिडिओ)

या हेलिकॉप्टरमध्ये पायलट सोडून एकूण 5 लोक बसू शकतात. या संपूर्ण प्रवासाची जबाबदारी ब्लेडची आहे. सकाळी हे हेलिकॉप्टर शिर्डीमध्ये येते, त्यानंतर दर्शन घेऊन दुपारपर्यंत हे हेलिकॉप्टर परतीच्या प्रवासाला निघते. सध्या या कंपनीकडे दोन हेलिकॉप्टर आहेत. प्रवाशांच्या मागणीनुसार ही हेलिकॉप्टर्स या तीनही मार्गांवर चालवली जातात. मान्सूनचा कालावधी सोडून हे हेलिकॉप्टर इतर सर्व महिन्यांमध्ये उपलब्ध असतील.