मुंबई-पुणे महामार्गावरअ (Mumbai-Pune Expressway) प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. येत्या 1 एप्रिलपासून मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर प्रवास करणे अधिक महाग होणार आहे. महार्गावरील टोलमध्ये (Mumbai-Pune Expressway Toll) 1 एप्रिलपासून 18.51% पर्यंत वाढ केली जाणार आहे. द्रुतगती मार्गावरील टोल दर तीन वर्षांनी वाढवला जातो. या मार्गावरील शेवटची टोल दर वाढ 1 एप्रिल 2020 रोजी करण्यात आली होती, त्यामुळे यंदाच्या एप्रिलपासून त्यामध्ये वाढ करणे आवश्यक आहे. पुढील टोल वाढ 1 एप्रिल 2026 रोजी होईल.
ऑगस्ट 2004 मध्येच 30 एप्रिल 2030 पर्यंत आकारल्या जाणार्या टोल दरासंदर्भात अधिसूचना जारी करण्यात आली होती. या 95 किमी लांबीच्या एक्स्प्रेस वेची सतत देखभाल आणि सुधारणा करण्यात येत आहे. त्यामुळे दर तीन वर्षांनी या मार्गावरील टोल वाढवला जात आहे.
अधिसूचनेनुसार, कार वापरकर्त्यांना आतापर्यंतच्या 270 रुपयांच्या तुलनेत 320 रुपये आकारले जातील. या मार्गावर धावणाऱ्या मिनी बसेसना 420 रुपयांच्या तुलनेत 495 रुपये मोजावे लागतील आणि दोन एक्सलपर्यंतच्या ट्रकला 580 रुपयांच्या तुलनेत 685 रुपये मोजावे लागतील. त्याचप्रमाणे प्रत्येक बसला 940 रुपये मोजावे लागतील. दोन पेक्षा जास्त एक्सल असलेल्या ट्रकला 1,630 रुपये आणि ट्रेलर्सना 2,165 रुपयांपर्यंत पैसे द्यावे लागतील. (हेही वाचा: Mumbai: मुंबईत 5 वर्षांच्या कालावधीत सर्वाधिक निवासी मालमत्तेची झाली विक्री, अहवालातून आले समोर)
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (MSRDC) ही मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाची अंमलबजावणी करणारी संस्था आहे, जी 2000 ते एप्रिल 2002 दरम्यान वेगवेगळ्या टप्प्यात उघडण्यात आली. दरम्यान, वाहतूक कोंडी आणि अपघात या दोन्हीमुळे 'मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे' कायम चर्चेचा विषय ठरला आहे. आता टोल दर वाढीमुळे तो पुन्हा चर्चेत आला आहे.