Accident | Image used for representational purpose | (Photo Credit: ANI)

मुंबई-पुणे एक्सप्रेस-वेवर झालेल्या भीषण अपघातात (Mumbai - Pune Expressway Accident) तीन जण ठार तर सहा जण जखमी झाले आहेत. हा अपघात आज (18 ऑक्टोबर) पहाटे साडेपाच वाजणेच्या सुमारास बोर घाटात झाला. बोर घाट (Bhor Ghat) हा अपघाती क्षेत्र म्हणून अलिकडे ओळखला जाऊ लागला आहे. या आधीही या घाटात विविध अपघात झाले आहेत. त्यात अनेकांचे प्राण गेले आहेत. तर अनेक जण जखमी झाले आहेत. आज घडलेला अपघातही विचित्र पद्धतीने घडला.

प्राप्त माहितीनुसार, कोंबडी वाहून नेणारा एक टेम्पो मुंबईच्या दिशेने निघाला होता. या टेम्पोने पुढच्या दुसऱ्या टेम्पोला धडक दिली. या अपघातामुळे पाठिमागची सहा वाहने (दोन टेम्पो, दोन कार, खाजगी बस आणि ट्रेलर) येऊन एकमेकांवर जोरदार आदळली. यात तीघे जण ठार झाले तर सहा जण जखमी झाले. जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. अपघात घडल्यामुळे काही काळ वाहतूक कोंडी निर्माण झाली. दरम्यान, वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी हजेरी लावत वाहतूक पूर्ववत केली. (हेही वाचा, Mumbai-Pune Expressway- मुबंई-पुणे एक्सप्रेस-वेवर अपघात, पाच ठार, पाच जखमी)

दरम्यान, काही दिवसांपूर्वी याच महामार्गावर अपघात घडला होता. या अपघातातही एक जण ठार तर चार गंभीर जखमी झाले होते. हा अपघात खंडाळा घाटातील खोपोली एक्झिटजवळ झाला होता. या अपघाताच्या काहीच दिवस आगोदर एक मालवाहतूक करणारा ट्रक मुंबईच्या दिशेने निघाला होता. चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा ट्रक थेट डोंगराला धडकला. या घटनेत दोघांचा मृत्यू झाला. तर तीघे जखमी झाले होते. त्यामुळे या महामार्गावर अपघाताची मालीकाच सुरु आहे की काय, असा सवाल उपस्थित केला जातो आहे.

एक्सप्रेस वे आणि बोर घाट दरम्यान वाहतू करताना वाहनांचा वेग मर्यादीत आणि ठरवून दिलेल्या नियमांनुसारच असावा अशी सूचना वाहतूक विभागाकडून नेहमीच केली जाते. तसेच, वाहनचालकांनी अतिशय काळजी घ्यावी असे म्हटले जाते. इतक्या सगळ्या सूचना करुनही अपघातांचे प्रमाण कमी होताना दिसत नाही.