प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फाइल इमेज)

गेल्या दोन वर्षांमध्ये मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर (Mumbai-Pune Expressway) झालेल्या अपघातांमध्ये 106 जणांचा मृत्यू झाला आहे. हे अपघात एक्स्प्रेस वेवर केल्या जाणाऱ्या पार्किंगमुळे झाले आहेत. पार्किंग केलेल्या वाहनांना पाठीमागून आलेल्या वाहनांची धडक दिल्याने झाले असल्याचे ‘सेव्ह लाईफ फाऊंडेशन’ने केलेल्या अभ्यासातून समोर आले आहे. (हेही वाचा - संचेती हॉस्पिटलचे प्रसिद्ध स्पाईन सर्जन डॉ. केतन खुर्जेकर यांचा मुंबई- पुणे एक्सप्रेसवे वर भीषण अपघातात दुर्दैवी मृत्यू)

2018 आणि 2019 या कालावधीत या महामार्गावर आतापर्यंत वाहने पार्क केल्यामुळे झालेल्या अपघातात 106 जणांचा मृत्यू झाला आहे. महामार्गावर उभी असलेली वाहने, वाहने चुकीच्या पद्धतीने ओव्हरटेक करणे, वाहनांचा वेग, चालकाच्या चुका आदी कारणामुळे हे अपघात घडून आले आहेत. महामार्गावर उभ्या असलेल्या वाहनांना आणि धिम्यागतीने जाणाऱ्या वाहनाला इतर वाहनाने धडक देणे हे रस्ते सुरक्षा मोहिमेसमोरील सर्वात मोठे आव्हान आहे. काही दिवसांपूर्वीच 3000 अवजड वाहन चालकांना सुरक्षित वाहने चालविण्याबाबत प्रशिक्षण देण्यात आले होते, असे सेव्ह लाईफ फाऊंडेशचे संस्थापक पियुष तिवारी यांनी सांगितले.

हेही वाचा - मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेवर पुन्हा वाहनांसाठी 80kmph वेग ठेवण्यात येणार

अपघात झाल्यानंतर अपघातग्रस्तांना मदत करणे हे आपले कर्तव्य आहे. विविध उपक्रम राबवून रस्ते अपघातातील मृत्यूंचे प्रमाण कमी करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. नागरिकांनी वाहने  वेगात चालवू नये. तसेच वाहन चालविण्यापूर्वी पुरेशी विश्रांती घ्यावी. काही वाहन चालक अचानक लेन बदलतात. त्यामुळे अपघात होण्याचा धोका वाढतो, असं एमएसआरडीसीचे उपाध्यक्ष राधेशाम मोपलवार यांनी सांगितलं.