Dr. Ketan Khurjekar (Photo Credits: Facebook)

रविवारी (15 सप्टेंबर) रोजी रात्री उशिरा मुंबई पुणे एक्सप्रेसवे (Mumbai- Pune Expressway) वर व्होल्वो बसच्या भीषण अपघातात संचेती हॉस्पिटलचे (Sancheti Hospital)  डॉ. केतन खुर्जेकर (Dr. Ketan Khurjekar) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. रविवारी रात्री तळेगाव जवळ रात्री 10.30 च्या सुमारास हा अपघात झाला. यावेळी कारचे चालक ज्ञानेश्वर बोडस (Dnyaneshwar Bodas) यांच्यासह डॉ. खुर्जेकर यांचा जागीच मृत्यू झाला तर अन्य दोन डॉक्टर गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर लगतच्या हॉस्पिटल मध्ये उपचार सुरु आहेत. विशेष म्हणजे आज डॉ. खुर्जेकर यांचा वाढदिवस होता, या आनंदाच्या दिवशीच त्यांच्या जाण्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.

प्राप्त माहितीनुसार,डॉ. खुर्जेकर हे मुंबईत एका मेडिकल परिषदेसाठी मुंबईत आले होते. रात्री उशिरा ते पुण्याला परत येत होते. यावेळी गाडीचा टायर पंक्चर झाल्याने तळेगाव जवळ गाडी थांबली होती, व कार चालक ज्ञानेश्वर बोडस पंक्चर काढत होते इतक्यात पाठीमागून येणाऱ्या एका भरधाव लक्झरी बसने कार ला जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला. यावेळी कारमध्ये सोबत असलेले अन्य दोन डॉक्टर जयेश पवार आणि प्रमोद भिलारे हे देखील गंभीर जखमी झाले त्यांना तातडीने लगतच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. (नाशिक मध्ये लवकरच सुरु होणार मेट्रो, राज्य मंत्रिमंडळात प्रकल्पाला मंजुरी)

दरम्यान, डॉ. खुर्जेकर यांच्या जाण्याने वैद्यकीय क्षेत्राची मोठी हानी झाल्याचे संचेती रुग्णालयाचे व्यवस्थापकीय विश्वस्त डॉ. पराग संचेती यांनी म्हटले आहे. डॉ. खुर्जेकर हे संचेती रुग्णालयाच्या अस्थीरोग विभागाचे प्रमुख होते. तसेच आतार्यंत त्यांनी मणक्याच्या 3500 शस्त्रक्रिया केल्या आहेत. 'एमएस ऑर्थोपेडिक्स'मध्ये त्यांना सुवर्णपदक सुद्धा प्राप्त आहे. आज त्यांचं वाढदिवशीच त्यांचा मृत्यू झाल्याने कुटुंबासमवेत हॉस्पिटल मध्ये सुद्धा शोक व्यक्त केला जात आहे.