PMC Bank घोटाळ्याबाबत 5 जणांविरुद्ध तब्बल 32,000 पानांचे आरोपपत्र दाखल
PMC Bank (Photo Credits: Twitter)

पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बँक घोटाळा (PMC Bank) बाबत,  मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने आज आरोपपत्र दाखल केले. या खटल्याशी संबंधित पाच आरोपींविरोधात मुंबईतील मेट्रोपॉलिटन दंडाधिकार्‍यांसमोर तब्बल 32 हजार पानांचे आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.

आरोपपत्रात एचडीआयएल कंपनीचे संचालक राकेश वाधवन आणि त्यांचा मुलगा सारंग, पीएमसीचे माजी व्यवस्थापकीय संचालक जॉय थॉमस, बँकेचे माजी अध्यक्ष वरयम सिंह आणि माजी बँक संचालक सुरजितसिंग अरोरा यांना या घोटाळ्यातील आरोपी ठरविण्यात आले आहे. या सर्वांवर फसवणूक, पुरावे नष्ट करणे आणि खोटी कागदपत्रे बनविणे यासह आयपीसीच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सप्टेंबरमध्ये पीएमसी बँकेचा हा खटला उघड झाल्यानंतर या सर्वांना अटक करण्यात आली होती. आता सध्या सर्व आरोपी न्यायालयीन कोठडीत आहेत. 32,000 पृष्ठांच्या आरोपपत्रात पीएमसी बँकेचे फॉरेन्सिक ऑडिट अहवाल आणि आरोपी बँक अधिकाऱ्यांनी खरेदी केलेल्या मालमत्तेची कागदपत्रेही आहेत. ही सर्व कागदपत्रे या आरोपींकडून ताब्यात घेण्यात आली होती. चार्जशीटमध्ये नोंदवलेल्या तथ्यांनुसार, बँक कर्मचारी आणि बँकेचे तत्कालीन संचालक जॉय थॉमस यांच्यात वाद झाला होता. हा वाद अनेक दिवस चालला त्यानंतर हा घोटाळा बाहेर येण्यास सुरुवात झाली. बँक कर्मचाऱ्यानेच याबाबत आरबीआयला माहिती दिली होती. (हेही वाचा: ठाकरे सरकार लवकर PMC बँक राज्य सहकारी बँकेत विलीन करणार?)

याव्यतिरिक्त, आरोपपत्रात बँक खातेदारांसह 340 साक्षीदारांचे निवेदनही आहे. फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम 164 अन्वये दंडाधिकार्‍यांकडे पोलिसांनी चार आवश्यक व महत्वाच्या साक्षीदारांचे जबाब नोंदवले आहेत. दरम्यान, जेव्हा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला पीएमसी बँकेने 6700 रुपयांचे कर्ज लपवण्यासाठी बनावट खाती उघडली असल्याचे निदर्शनास आले, तेव्हा या बनेक्त घोटाळा झाल्याचे समोर आले. त्यानंतर अनेकवेळा खातेदारांना या बँकेतून पैसे काढण्यावर निर्बंधही घालण्यात आले होते.