Mumbai Police on Ghost Riding | Photo Credits: Unsplash and ANI

मुंबई पोलिसांचं ट्वीटर अकाऊंट जितकं नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी अलर्ट असतं तितकंच ते सण, इव्हेंटच्या निमित्ताने क्रिएटीव्हिटी वापरत सजगता निर्माण करण्यासाठी देखील आता लोकप्रिय आहे. आज 31 ऑक्टोबर हॅलोवीनची रात्र (Halloween Night)! मुंबई पोलिसांनी हॅलोविनच्या शुभेच्छा तर दिल्या आहेत पण त्यासोबतच Ghost Riding सह बाईक, कार्सच्या सहाय्याने स्टंटबाजी करणार्‍यांना सज्जड दम देखील भरला आहे. वाहनावर धोकादायक स्टंट करताना ज्यांना भीती वाटत नाही त्यांनी पुढे जाऊन होणाऱ्या शिक्षेची मात्र भीती बाळगावी. असे ट्वीट मुंबईचे पोलिस आयुक्त Param Bir Singh यांनी अधिकृत अकाऊंट वरून केले आहे.

हॅलोवीन हे पाश्चिमात्य संस्कृतीतील एक सेलिब्रेशन आहे. हॅलोवीन दरम्यान मेलेल्या व्यक्तींचे आत्मे त्यांच्या कुटुंबीयांना भेटायला येतात. 'सॅमहॅन' असा ओळखला जाणारा हा दिवस त्यांच्या पितरांच्या भेटीचा असल्याचा समज आहे. त्यानिमित्ताने युरोपासह अमेरिका मध्ये चर्च मध्ये जाऊन प्रार्थना केली जाते. आता हे लोण भरतामध्येही आलं आहे. भूता खेताच्या गोष्टींचं आकर्षण असलेल्या रायडर्समध्ये घोस्ट रायडिंगची क्रेझ असते. अशा स्टंटबाजांना लगाम लावण्यासाठी मुंबई पोलिसांनी त्यापासून लांब राहण्याचं आवाहन केले आहे. Happy Halloween: हॅलोविन म्हणजे नेमकं काय? जाणून घ्या या सेलिब्रेशन बाबत '7' इंटरेस्टिंग गोष्टी.

मुंबई पोलिस ट्वीट 

घोस्ट रायडिंग मध्ये प्रामुख्याने चालत्या कार, बाईकवरून चालक एका विशिष्ट क्षणी गायब होतो. आणि चालक विरहित गाडी धावत असल्याचा भास निर्माण करतो याला घोस्ट रायडिंग म्हणतात. पण या स्टंटबाजीमुळे चालक आणि सोबतच इतर पादचार्‍यांना गंभीर इजा होण्याची भीती असते. त्यामुळेच भुतांना घाबरत नसलात तरीही कायद्याची भीती बाळगा आणि असे स्टंट टाळा अन्यथा जेलमध्ये जाल असा सज्जड दम मुंबई पोलिसांनी भरला आहे.

मुंबईमध्ये पाम बीच रोड, वांद्रे बॅन्ड सॅन्ड, पवई लेक अशा रात्री तुलनेत कमी गर्दी असलेल्या ठिकाणी स्टंट्बाज तरूण मंडळी दिसतात. पण आता असे स्टंट करू नका असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.