
विलेपार्ले येथे गझाली हॉटेलमध्ये झालेल्या फायरिंगप्रकरणी अंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारी (Ravi Pujari) याला पुढील चौकशीसाठी मुंबई पोलिसांच्या (Mumbai Police) ताब्यात देण्यास अखेर कर्नाटक कोर्टाने (Karnataka Court) हिरवा कंदिल दिला आहे. रवी पुजारीचा ताबा मिळवण्यासाठी मुंबई पोलीस न्यायालयीन लढा देत होती. आज अखेर रवी पुजारीचा ताबा घेण्यासाठी कर्नाटक न्यायालयाकडून मुंबई पोलिसांना परवानगी मिळाली आहे. तसेच मुंबई पोलीस रवी पुजारीला सोमवारी (22 फेब्रुवारी) कर्नाटकमधून मुंबईत घेऊन येणार असल्याची माहिती समोर आली आहे.
रवी पुजारीला गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यातच आफ्रिका खंडातील सेनेगल येथून त्याला अटक करण्यात आली होती. रवी पुजारी हा अँथोनी फर्नांडिस या नावाने वावरत होता. रवी पुजारीवर संपूर्ण भारतात हत्या, हत्येचा प्रयत्न, खंडणी, खंडणीसाठी धमकावणे, बेकायदेशीर कृत्य करणे, संघटीत गुन्हेगारी करणे यांसारखे अडीचशे पेक्षा जास्त गंभीर गुन्हे दाखल आहेत. हे देखील वाचा- पुण्यात सलग दुस-यांदा मास्क न घातलेला आढळलेल्या व्यक्तीस भरावा लागणार 1000 रुपयांचा दंड- जिल्हाधिकारी राजेश देशमुख
रवी पुजारी सध्या 51 वर्षाचा आहे. रवी पुजारी याचा जन्म कर्नाटकातील उडिपी जिल्ह्यातील मालपी गावात झाला आहे. त्याचे वडील एका शिपिंग कंपनीत नोकरीला होते. रवी पुजारीचा जन्म कर्नाटकमध्ये झाला असला तरी, तो लहानाचा मोठा मुंबईमध्ये झाला. रवी पुजारीच्या गुन्हेगारीची सुरुवात मुंबईच्या रस्त्यावरुन झाली. त्याने सुरुवातीला छोटे- मोठे गुन्हे करत होता. परंतु, बाळा झाल्टेची हत्या केल्यानंतर गुन्हेगारी विश्वात चर्चेत आला. त्यावेळी छोटा राजनची त्यावर नजर पडली. त्यानंतर तो छोटा राजन गॅंगसाठी काम करू लागला.