प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

मुंबईत डान्सबारवर (Mumbai Dance Bar) बंदी असताना एका बारमध्ये बेकायदेशीरपणे डान्सबार चालवला जात असल्याची माहिती समोर आली आहे. मुंबई पोलिसांच्या सोशल सर्व्हिस ब्रांचने रविवारी रात्री अंधेरी येथील दीपा बारवर (Deepa Bar) छापा टाकून 17 मुलींना ताब्यात घेतले. भिंतीत बनवलेल्या एका तळघरात मुलींना लपवून ठेवण्यात आले होते. या प्रकरणी बार मॅनेजर आणि कॅशियरसह 3 कर्मचाऱ्यांवर अंधेरी पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका एनजीओच्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली. यादरम्यान स्थानिक पोलीस ठाण्याच्या पोलिसांना या छाप्याची माहितीही नव्हती.

कोरोनाच्या काळातही या डान्सबारमध्ये नियमांचे खुलेआम उल्लंघन होत असल्याची तक्रार एका एनजीओच्या वतीने करण्यात आली होती. तक्रारीमध्ये पुढे म्हटले होते की, बार डान्सर्स या बारमध्ये खुलेआम डान्स करतात आणि दररोज शेकडो लोक या बार डान्समध्ये लाखो रुपये खर्च करतात. त्याचबरोबर हा डान्सबार रात्रभर चालत होता. मात्र स्थानिक अंधेरी पोलिसांना याची माहितीही नव्हती. तक्रारीनंतर मुंबई पोलिसांच्या सोशल सर्व्हिस ब्रांचने शनिवारी रात्री 11.30 ते 12.30 च्या सुमारास या ठिकाणी छापा टाकला.

मिळालेल्या माहितीनुसार, डान्सबारवरील बंदी उठल्यानंतर मुंबईत फक्त चार मुलींना काम करण्याची परवानगी आहे. मात्र ऑर्केस्ट्राच्या नावाखाली 4 हून अधिक मुलींना नाचवले जाते. डीसीपी राजू भुजबळ यांनी सांगितले की, जेव्हा पथकाने दीपा बारवर छापा टाकला तेव्हा तिथे आधी काहीही दिसले नाही. परंतु घटनास्थळावरील भिंतीवरील आरशांवर पोलिसांना संशय आला. त्यांनी मोठा हातोडा मागवून भिंतीवरील काच फोडण्याचे आदेश दिले. त्यावेळी या काचेच्या मागे एक मोठी गुप्त खोली असल्याचे निदर्शनास आले. या ठिकाणी 17 बारडान्सर्स होत्या, ज्यांना तिथून बाहेर कढण्यात आले आहे. (हेही वाचा: Andheri Lift Accident: अंधेरी पूर्व मध्ये एका इमारती मध्ये लिफ्ट कोसळल्याने 5 जण जखमी; BMC ची माहिती)

दरम्यान, या संपूर्ण प्रकरणावरून राजकारणही सुरू झाले आहे. सरकारच्या संगनमताने हा बार सुरू असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते करत आहेत. दीपा डान्स बार कुप्रसिद्ध असून अनेक वेळा मोठ्या सेलिब्रिटींना येथून पकडण्यात आले आहे. यापूर्वीही लोकांनी तक्रार केली होती की, निर्बंध असूनही दीपा डान्सबार रात्रंदिवस सुरू असून त्यावर कारवाई करण्याचे पुरेसे अधिकार पोलिसांकडे नाहीत. याउलट मुंबई पोलिसांच्या संरक्षणात दीपा डान्सबार सुरू असल्याचा आरोप पोलिसांवर होत आहे.