मुंबईत साजरा झाला कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमचा वाढदिवस; सोशल मिडियावर फोटो पोस्ट केल्यानंतर पोलिसांनी केली कारवाई (Photo)
दाऊद इब्राहिम (Photo Credits-Twitter)

भारताचा मोस्ट वॉन्टेड दहशतवादी आणि अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम (Gangster Dawood Ibrahim) याचा वाढदिवस साजरा करणे काही लोकांना चांगलेच महागात पडले आहे. 26 डिसेंबर रोजी या वाढदिवसाची फेसबुक पोस्ट व्हायरल झाल्यानंतर मुंबई पोलिसांनी (Mumbai Crime Branch) याबाबत कारवाई केली आहे. या अंतर्गत काही लोकांना ताब्यात घेतले आहे. एका छोट्या गुन्हेगाराने ही फेसबुक पोस्ट लिहिली होती. या व्हायरल पोस्टची दखल घेत मुंबई पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. या वाढदिवसाच्या उत्सवात कोणाचा सहभाग होता याचा शोध घेण्याचा पोलिस प्रयत्न करीत आहेत.

26 डिसेंबर रोजी शेरा चिकना नावाच्या वापरकर्त्याच्या फेसबुक अकाऊंटवरून, ‘हॅपी बर्थडे बॉस’ लिहून चार फोटो पोस्ट केले गेले. पहिल्या फोटोत काही केक्स होते आणि उर्वरित तीन फोटो दाऊद इब्राहिमचे होते. पोलिसांच्या सुत्रानुसार मुंबईतील डोंगरी भागात हा वाढदिवस साजरा केल्याचा आरोप आहे. फेसबुक पोस्ट व्हायरल झाल्यानंतर हे फोटो व्हाट्सएपवरही शेअर केले गेले. या वाढदिवसाच्या उत्सवात कोण कोण सहभागी होते याविषयी आता मुंबई गुन्हे शाखा चौकशी करत आहे.

दाऊद इब्राहिम वाढदिवस

हे फोटो एका खासगी समारंभात घेण्यात आले होते. दाऊदचा 26 डिसेंबर रोजी वाढदिवस होता आणि उपलब्ध आकडेवारीनुसार परवा अंडरवर्ल्ड डॉन 64 वर्षांचा झाला. सोशल मीडियावर दाऊदच्या वाढदिवसाच्या पोस्ट केलेल्या फोटोंबाबत, हायकोर्टाचे वकील अजय श्रीवास्तव यांनी संबंधित व्यक्तीवर कठोर कारवाई केली जावी अशी मागणी केली आहे. दहशतवाद्याचा जन्मदिन साजरा केल्याने देशात चुकीचा संदेश पसरविला जात असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. (हेही वाचा: भारताकडून दाऊद इब्राहीम याच्यासह पाकिस्तानलाही दणका; अमेरिकेने दिला पाठिंबा, केले कौतुक)

दरम्यान, हे फोटो फेसबुकवर पोस्ट केल्यानंतर गोरगाव येथे राहणारे मोहसीन शेख यांच्या नजरेस ते पडले. त्यानंतर त्यांनी या फोटोजना व्हायरल केले व  ते मुंबई पोलिस व सायबर सेलकडे पाठविण्यात आले. दाऊद इब्राहिम हा भारतासाठी मोस्ट वॉन्टेड आहे. त्याच्यावर मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोटांच्या मालिकेचा आरोप आहे. या स्फोटानंतर तो देश सोडून पळून गेला, तेव्हापासून भारतीय एजन्सीज त्याला अटक करण्याचा प्रयत्न करीत आहेत.