मुंबई मॅरेथॉन स्पर्धेसाठी बंदोबस्ताच्या कर्तव्यावर राहिलेल्या महिला पोलिस हवालदार कांचन प्रमोद भिसे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्या 46 वर्षांच्या होत्या. इंडियन हेरिटेज सोसायटी यांच्या वतीने मुंबई संस्कृती फेस्टिव्हल 2023 चे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या बंदोबस्तावर असताना कांचन भिसे यांना अचानक चक्कर आली आणि त्या खाली कोसळल्या. दरम्यान, त्यांना उलट्या झाल्या. त्यामुळे त्यांना सेंट जॉर्ज हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान, रविवारी त्यांचा मृत्यू झाला. बंदोबस्तावर असताना मुंबई मॅरेथॉनचा आंतरराष्ट्रीय ॲम्बेसिडर आणि जमैकाचा ऑलिम्पिक सुवर्ण विजेता धावपटू योहान ब्लेक यांच्योसबत त्यांनी सेल्फी घेतला होता. हा सेल्फी त्यांच्या आयुष्यातील शेवटचा सेल्फी ठरला.
पोलिस हवालदार कांचन प्रमोद भिसे या मुंबई पोलिसांच्या विशेष शाखांमध्ये कार्यरत होत्या. रविवारी रात्री 8 वाजणेच्या सुमारास त्या एमआरए मार्ग पोलिस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या फेस्टिव्हल बंदोबस्तासाठी कर्तव्यावर होत्या. याच वेळी त्यांना अचानक चक्कर आली आणि त्या खाली कोसळल्या. दरम्यान, सहकाऱ्यांनी त्यांना आधार दिला. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचार केले. मात्र, त्यांचा मृत्यू झाला. (हेही वाचा, Mumbai Police Wishes Makar Sankranti: गोड बोलून ओटीपी मागणाऱ्यांना फक्त तीळगूळ द्या, ओटीपी नाही! मुंबई पोलिसांनी नागरिकांना दिल्या खास मकर संक्रांतीच्या शुभेच्छा)
इंडियन हेरिटेज सोसायटी यांच्या वतीने मुंबई संस्कृती फेस्टिव्हल 2023 कार्यक्रमाच्या बंदोबस्तापूर्वी सकाळी त्या मुंबई मॅरेथॉनच्या बंदोबस्तासाठीही तैनात होत्या. अत्यंत हसतमुख, मनमिळावू आणि एक धडाडीच्या पोलीस कर्मचारी असलेल्या कांचन भिसे यांचे कर्तव्यावर असताना उपचारादरम्यान झालेल्या निधनामुळे त्यांच्या सहकाऱ्यांना धक्का बसला आहे.