Representational Image (Photo Credits: File Image)

वन्य प्राणी तस्करी विरोधी कारवाई करताना मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) एका रॅकेटचा पर्दाफाश केला. ही टोळी दुर्मिळ सँड बोआ (Sand Boa) नावाच्या सापाची तस्करी करत असे. हा साप 'मांडूळ' (Eryx johnii) म्हणूनही ओळखले जाते. विशेषता हा साप त्याच्या कथीत औषधी गुणधर्म (Traditional Medicine) आणि इतर काही विशेष गुणांसाठी ओळखला जातो. खास करुन काळी जादू (Black Magic) करतानाही त्याचा वापर केल्याचे सांगितले जाते. त्यामुळे काळ्या बाजारात या सापाला विशेष मागणी आहे. त्याची तस्करीही मोठ्या प्रमावर होते. पोलिसांनी रविवारी केलेल्या कारवाईत चार जणांना अटक केली आहे. त्यांच्यावर वन्य प्राणांची तस्करी आणि वन कायद्यातील विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

सँड बोआ उर्फ मांडुळ

मुंबई पोलिसांच्या कफ परेड शाखेने गुप्त माहितीच्या आधारे कारवाई करत वन्यजीव तज्ञ गणेश गायकवाड यांच्या मदतीने मेकर टॉवर एफ जवळ सापळा रचला आणि संशयितांना ताब्यात घेतले. संशयितांकडून पोलिसांनी 55 इंच लांब आणि अंदाजे 4.8 किलो वजनाचा जीवंत साप ताब्यात घेतला. हा साप सँड बोआ म्हणजे मांडुळ प्रजातीचा होता. पोलिसांनी पकडलेल्या संशयित आरोपींमध्ये तीन पुरुष आणि एका अल्पवयीनाचा समावेश आहे. (हेही वाचा, Sand Boa Snake: काळ्या बाजारात सॅंड बोआ सापाची सर्वाधिक मागणी; जाणून घ्या तस्करीचे कारण)

मुंबई पोलीस अधिकाऱ्यांनी माहिती देताना सांगितले की, भारतीय कायद्यानुसार संरक्षित प्रजाती असलेल्या या सापाची बाजारातील अंदाजे किंमत 30 लाख रुपये आहे. नरसिंह सत्या डोटी (40), रवी वसंत भोईर (54), अरविंद चैतुराम गुप्ता (26), शिवा मल्लेश आडेपू (18-) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.संशयित आरोपींकडे साप बाळगणे किंवा त्याची विक्री करण्यासाठी आवश्यक असा कोणताही परवाना नसल्याचे मान्य केले आहे. शिवाय, पारंपरिक औषध आणि काळी जादू करण्यासाठी हा साप विकण्याचा आरोपींचा हेतू असल्याचेही प्राथमिक चौकशीत पुढे आल्याचे पोलिसांनी सांगितले. (हेही वाचा, Sorcery Victim's Skull: जिवंत महिलेच्या डोक्यातून डॉक्टरांनी काढल्या 77 सुया, पीडिता जादूटोणा प्रकाराची बळी; ओडिशा राज्यातील घटना)

पोलिसांनी आरोपींविरुद्ध वन्यजीव संरक्षण कायदा, 1972 च्या कलम 39(3)(A), 44, 48(A), आणि 51 सह विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले आहेत. संशयित सध्या पोलीस कोठडीत असून त्यांची चौकशी सुरू आहे. अटक केलेल्या व्यक्ती दुर्मिळ प्रजातींच्या पूर्वीच्या विक्रीत गुंतलेली आहेत का आणि कोणत्याही अतिरिक्त लपलेल्या प्राण्यांचा शोध घेत आहेत का याचाही अधिकारी तपास करत आहेत. आरोपी सध्या पोलीस कोठडीत आहेत. दरम्यान, आरोपीचे वकील हितेश पटेल यांनी दावा केला की, अटक चुकीची आणि बनावट आहे. आरोपींकडे असलेला साप विक्री करण्याचा त्यांचा कोणताही हेतू नव्हता. तरीदेखील त्यांना अटक करण्यात आली आहे.