Mumbai Local Train | Image Used for Representational Purpose Only | (Photo Credits: PTI)

मुंबई (Mumbai) मध्य (Central Railway) आणि हार्बर रेल्वे (Harbor Railway) मार्गावरील रेल्वे वाहतूक सेवा खोळंबली आहे. बुधवारी (18 डिसेंबर 2019) सायंकळाच्या वेळी कुर्ला रेल्वे स्थानक नजिक ओव्हरहेड वायर (Overhead Wire) तुटल्याने वाहतुकीचा खोळंबा झाल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांनी दिले आहे. मध्य रेल्वे मार्गाने कर्जत, कसारा ते पुणे, नाशिक येथून आणि हार्बर रेल्वे मार्गाने खारघर, नेरुळ ते पनवेल येथून असंख्य नागरिक, चाकरमाणी आणि व्यवसायिक, विद्यार्थी आणि महिला, तरुणी अशा विविध वर्गांतील लोक भल्या सकाळी मुंबई शहरात दाखल होतात. हे सर्व लोक सायंकाळच्या वेळी आपल्या घरी परतत असतात. या सर्व नागरिकांना घरी पोहोचण्यासाठी रेल्वे हा एकमेव स्वस्त आणि वेगवान पर्याय उपलब्ध असतो. मात्र, ऐन गर्दीच्या वेळी खोळंबा झाल्याने प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागतो.

प्राप्त महिती अशी की, ओव्हरहेड वाय तुटल्यामुळे निर्माण झालेला बिघाड दूर करण्यासाठी रेल्वे प्रशानाचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले आहेत. तसेच, बिघाड दूर करुन वाहतूक यंत्रणा पूर्ववत करण्यासाठी जोरदार प्रयत्न केले जात आहेत. मात्र, मध्य रेल्वे मार्गावर जर वाहतुकीचा खोळंबा झाला तर त्याचा परिणाम एक्सप्रेस आणि मालवाही गाड्यांवरही होत असतो. महत्त्वाचे म्हणजे मुंबईकर प्रवाशांना अनेकदा वाहतुक विस्कळीत होण्याचा फटका सहन करावा लागतो. (हेही वाचा, रेल्वे तिकीट आरक्षणासाठी नियमात बदल, जाणून घ्या कोणत्या गोष्टीसाठी किती रुपये स्विकारणार)

मध्य रेल्वे मार्गावर अनेकदा ओव्हरहेड वायर तुटूणे, पेंटाग्राफवर कावळा अडकणे, रुळाला तडे जाणे यांसारख्या घटना घडल्यामुळे वाहतुक सेवा विस्कळीत झालेली असते. कधीकधी सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्यानेही वाहतुक सवा विस्कळीत झाल्याचे पाहायला मिळते. अशा घटना घडल्यामुळे प्रवाशांचा वेळ मात्र हाकनाक वाया जातो. त्यांच्या प्रवासांचे पूर्ण वेळापत्रकच कोलमडून जाते.