मुंबईमध्ये कोरोना व्हायरस आपला विळखा जसा घट्ट करतोय तशी प्रशासकीय यंत्रणा देखील अधिक जोमाने कामाला लागली आहे. अधिकाधिक लोकांना कोरोना व्हायरस संसर्गापासून सुरक्षित ठेवण्यासाठी कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळताच त्याच्या घराच्या आसपासचा परिसर बंद केला जात आहे. मुंबईमध्ये धारावी परिसरात काल पहिला कोरोनाबाधित आढळला. रात्री कोरोनाबाधिताचा मृत्यूचीदेखील बातमी आली. यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव काही भाग सील करण्यात आला. मात्र यावेळेस काही लोकांनी बीएमसी कर्मचार्यांवरच हल्ला केल्याची बाब समोर आली आहे. या हल्ल्यातील आरोपींविरोधात विविध कलमांर्तगत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. एकाला स्थानिक पोलिसांनी ताब्यात घेतले असून अन्य 7 ते 8 जणांचा शोध सुरू आहे. Coronavirus In Maharashtra: BMC चा 52 वर्षीय सफाई कामगार धारावी मधील दुसरा कोरोनाबाधित रूग्ण; कुटुंबीयांसह 23 सह कर्मचारी क्वारंटीन.
काल एका कोरोनाबाधिताचा धारावीमध्ये मृत्यू झाल्यानंतर आज (2एप्रिल) बीएमसीमधील एका सफाई कामगारालादेखील कोरोना झाल्याचं समोर आलं आहे. तो वरळीचा रहिवासी असून त्याच्या कुटुंबियांसह 23 अन्य सहकर्मचार्यांना खबरदारीचा उपाय म्हणून क्वारंटीन करण्यात आलं आहे.
ANI Tweet
Mumbai: One arrested on charges of attacking Brihanmumbai Municipal Corporation (BMC) team yesterday which had reached Dharavi to seal the building where #COVID19 positive patient was found. Case registered under various sections of IPC. 7 to 8 more people are wanted in this case
— ANI (@ANI) April 2, 2020
मुंबई प्रमाणेच दिल्ली, मध्यप्रदेशातही कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी जीव धोक्यात घालून रूग्णसेवा करणार्या डॉक्टरांवर हल्ले, अंगावर थुंकणे असे घृणास्पद प्रकार समोर आले आहेत. सध्या भारतामध्ये कोरोनाबाधितांचा आकडा 1965 आहे. त्यापैकी 1764 वर उपचार सुरू आहेत. 50 जणांचा यामध्ये मृत्यू झाला असून 151 लोकांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे.