पुण्यातील ओला चालकाला मुंबईत मारहाण, कपडे काढून उठाबशांची शिक्षा
पुण्यातील ओला चालकास मुंबईत मारहाण ((Photo Credits: ANI)

संपात सहभागी न झालेल्या एका ओला चालकाला बेदम मारहाण करत कपडे काढून उठाबशांची शिक्षा दिल्याचा खळबळजनक व्हिडिओ पुढे आला आहे. प्राप्त माहितीनुसार पीडित ओला चालक हा पुण्यातील असून, तो पुण्यातून भाडे घेऊन मुंबईत आला होता. मुंबईत आल्यावर त्याच्यासोबत हा प्रकार घडला. दरम्यान, भांडूप पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. संताजी पाटील असे पीडित ओला चालकाचे नाव आहे.

गेले आठ दिवस ओला-उबेर चालक आपल्या विविध मागण्यांसाठी संपावर होते. त्यामुळे ओला चालकांनी गाड्या रस्त्यावर काढल्या नव्हत्या. दरम्यान, संताजी पाटील हे संपात सहभागी झाले नाहीत. ते पुण्यातून भाडे घेऊन मुंबईला आले. मात्र, संपात सहभागी असलेल्या ओला-उबेरच्या काही चालकांनी मुंबईत भाडे सोडून परतणाऱ्या संताजी यांना गाठले. त्यांना भांडूप येथील अमरनगर परिसरातील एका कार्यालयात नेऊन पट्ट्यांनी आणि लाथाबुक्क्यानी मारहाण केली. तसेच, त्यांना कपडे काडून उठाबशाही काढण्याची शिक्षा देण्यात आली. हा प्रकार शुक्रवारी घडला. दरम्यान, या मारहाणीचा व्हिडिओही व्हायरल झाला.

मारहाण झाल्यानंतर त्याच आवस्थेत संताजी पाटील हे पुण्याला परतले. मात्र, व्हायरल झालेला व्हिडिओ पाटील यांच्या मित्रांच्या दृष्टीस पडला. त्यानंतर मित्रांनी पाटील यांना घेऊन भाडूप गाठले आणि घडल्या प्रकाराबद्दल भांडूप पोलिसांत तक्रार दिली. मिळालेल्या तक्रारीवरुन पाटील यांनी चार जणांना ताब्यात घेतले आहे. तसेच, इतर आरोपींचाही शोध सुरु केला आहे. उर्वरीत आरोपींनाही लवकरच ताब्यात घेऊ, अशी माहिती मिड-डे ने वरिष्ठ पोलीस निरिक्षक रमेश खाडे यांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तात दिली आहे. (हेही वाचा, बंदूकीचा धाक दाखवून, व्यापाऱ्याला 5 लाखांचा गंडा)

मुंबईतील बरेच ओला-उबेर चालक संपात सहभागी होते. मात्र, त्यातील काही चालक हे जे चालक संपात सहभागी न होता ओला-उबेरच्या गाडीने भाडे घेऊन मुंबईत येत होते त्यांना मारहाण करत होते. संताजी पाटील यांच्यासोबतही असाच प्रकार घडला.