Mumbai: वसई रेल्वे स्थानकावर चालू होते अश्लील कृत्य; थांबवण्यास गेलेल्या हवालदाराला शिवीगाळ, मारहाण, तोंडावर थुंकले
Arrest | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

वसई रेल्वे स्थानक (Vasai Railway Station) परिसरात मंगळवारी रात्री एका 27 वर्षीय व्यक्तीवर एका पोलीस हवालदाराlला मारहाण करून त्याच्यावर थुंकल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना प्लॅटफॉर्म क्रमांक 3 वर रात्री 10.30 च्या सुमारास घडली. याप्रकरणी भारतीय दंड संहिता (IPC) च्या कलम 353, 186, 504, 506, 332 आणि 323 अन्वये एफआयआर नोंदवला आहे. ऑन ड्युटी सार्वजनिक सेवकावर हल्ला करणे, शिवीगाळ करणे, धमकावणे आणि त्याचे कर्तव्य बजावण्यात अडथळा आणणे यासाठी हा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

आरोपीला अद्याप अटक करण्यात आलेली नाही, असे पोलिसांनी सांगितले. मिळालेल्या माहितीनुसार, रात्रीच्या ड्युटीवर असलेल्या 32 वर्षीय कॉन्स्टेबलने नालासोपारा (पूर्व) येथील कुलदीप तिवारी या आरोपीला एका महिलेसोबत पाहिले. आरोपी एका महिलेला मिठी मारत होता आणि तिचे चुंबन घेत होता. या दोघांचे सार्वजनिक ठिकाणी अश्लील कृत्य चालू होते.

हवालदाराने त्यांना सार्वजनिक ठिकाणी अश्लील कृत्य करू नका, तसेच तेथून निघून जाण्यास सांगितले. त्यानंतर चिडलेल्या आरोपीने हवालदाराला शिवीगाळ केली आणि धमकावले आणि त्याच्या तोंडावर दोनदा थुंकला तसेच त्याची कॉलरदेखील पकडली. (हेही वाचा: गुणवंत सदावर्ते यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी, पुणे येथेही गुन्हा दाखल; अडचणी आणखी वाढल्या)

दरम्यान, याआधी ड्रंक ड्राईव्ह प्रकरणी वाहतूक पोलिसांनी कारवाई केल्याच्या रागातून अनिल गुप्ता मद्यपीने पोलीस हवालदारावर हल्ला केला होता. ही घटना ठाण्यात घडली होती व याप्रकरणी राबोडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. तक्रारीमध्ये म्हटले होते की, कापूरबावडी वाहतूक विभागाचे पोलीस हवालदार नागनाथ कांदे यांच्या डोक्यावर गुप्ताने वीटेने हल्ला केला होता. याप्रकरणी कांदे यांना उपचारासाठी एका खासगी रुग्णालयात दाखल करावी लागले होते.