Photo Credit -Twitter

Mumbai News :  लोकसभा निवडणुका (Loksabha Election 2024) तोंडावर असताना मुंबईमध्ये महानगरपालिकेच्या (BMC )आयुक्तांच्या बदलीचा निर्देश निवडणूक आयोगाने दिला. त्यामुळे मुंबईत निवडणुकीच्या माहोलला एक वेगळं वळण मिळालं आहे. इकबाल सिंह चहल ( Iqbal Singh Chahal) यांची जागा रिकामी झाली असताना त्या जागेवर आता अनेक उमेदवारांची नावे चर्चेत येत आहेत. मात्र, शहरात नव्या आयुक्तपदी नेमकी कोणाची नियुक्ती होणार याचीच उत्सुकता सर्वांना लागली आहे. मात्र, चहल यांच्या बदलीमुळे विरोधकांकडून निवडणूक आयोगाच्या निर्णयावर टिका केली जात आहे. सत्ताधाऱ्यांसह मुख्यमंत्र्यांच्या मर्जीत राहून काम करण्याची अपेक्षा नव्या आयुक्तांकडून असणार असल्याचं विरोधकांचं म्हणणं आहे. (हेही वाचा: ECI चा दणका; बीएमसी आयुक्त Iqbal Singh Chahal सह अतिरिक्त आयुक्त, उपायुक्तांना हटवलं )

सध्याच्या घडीला चहल यांच्या जागेवर ज्येष्ठ सनदी अधिकारी भूषण गगराणी आणि असीम गुप्ता यांच्या नावांची चर्चा आहे. गगराणी यांच्या नवाची तुलनेनं अधिक चर्चा होत असल्यामुळे आता मुंबई शहराच्या महानगरपालिका आयुक्तपदी त्यांची खरंच वर्णी लागते का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. महाविकासआघाडी सत्तेत असताना इकबाल सिंह चहल आदित्य ठाकरे यांच्यासोबत अनेकदा काम करताना दिसले. राज्यातील सत्तांतरानंतर त्यांनी एकनाथ शिंदे अर्थात राजच्याच्या मुख्यमंत्र्यांशी चांगलं नातं ठेवत त्यांच्यासोबत काम केलं. स्वच्छ मुंबई मोहिमेसाठीही चहल यांनी मोलाचं योगदान दिलं, किंबहुना अद्यापही ते या कामात हिरीरिनं पुढाकार घेत आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार मुंबई रेसकोर्सच्या जागेच्या करारामध्ये चहल यांची महत्त्वाची भूमिका राहिली आहे. (हेही वाचा:ED Summons Iqbal Singh Chahal: इक्बालसिंह चहल यांना ईडीची नोटीस; 100 कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी पाठवले समन्स )

कोरोना काळात तत्कालीन आयुक्त प्रवीण परदेशी यांना तडकाफडकी हटवून त्यांच्या जागी चहल यांची नियुक्ती करण्यात आली होती. चहल यांनादेखील त्यांच्या कार्यकाळामध्ये अनेक अडचणींना सामोर जावं लागलं. कोरोना काळात करण्यात आलेल्या अनेक खरेदींवर पालिकेच्या अनेक अधिकाऱ्यांना चौकशीला सामोरं जावं लागलं. चहल मात्र चौकशीच्या कचाट्यात सापडले नव्हते.