राष्ट्रवादी युवक काँग्रेसची पोस्टरबाजी | (Photo Credits: Twitter)

सध्या देशभरात निवडणूकांचे वारे वाहत असताना राज्यातही राजकीय हालचालींना उधाण आले आहे. निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर अनेक नेते पक्षांतर करत आहेत. अलिकडेच राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) आणि काँग्रेस (Congress) पक्षातील दोन नेत्यांच्या मुलांनी भाजपात प्रवेश केला. यावर मुंबईतील राष्ट्रवादी युवक काँग्रेसने भाजपवर (BJP) जोरदार टीका केली आहे.

'ज्यांना आम्ही नाकारले आणि हाकलले, त्यांनाच तुम्ही स्वीकारले, गोंजारले. आपला पाळणा हलणार की लोकांचीच लेकरं मांडीवर घेणार?' असा खोचक सवाल करत राष्ट्रवादीने पोस्टरच्या माध्यमातून भाजपवर निशाणा साधला आहे. पुढे 'बुरा न मानो होली है!' असेही लिहिले आहे.

काही दिवसांपूर्वी काँग्रेस नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांचे सुपुत्र सुजय विखे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर कालच राष्ट्रवादीचे नेते विजयसिंह मोहिते पाटील यांचा मुलगा रणजितसिंह यांनीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित भाजपात प्रवेश केला. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसला चांगलाच धक्का बसला असून त्यांनी भाजपवर खोचक टीका केली आहे.