काँग्रेस नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीवर सुजय विखे-पाटील यांचा भाजपमध्ये प्रवेश
Sujay Vikhe Patil Enter Into Bjp | (Photo Credits-ANI)

Lok Sabha Election 2019: ज्येष्ठ नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांचे चिरंजीव सुजय विखे पाटील ( Sujay Vikhe Patil) यांनी भारतीय जनता पक्षात (BJP) आज (मंगळवार, 12 मार्च 2019) रितसर प्रवेश केला. सुजय विखे पाटील हे अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून (Ahmednagar Lok Sabha constituency) निवडणूक लढविण्यासाठी आग्रही होते. मात्र, आघाडीच्या जागावाटपात हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसकडे होता. या मतदारसंघ काँग्रेसला सोडण्यास राष्ट्रवादी काँग्रेसने नकार दर्शवला त्यामुळे सुजय विखे यांना निवडणूक लढवायची असल्यास काँग्रेस विरोधात मैदानात उतरण्याशिवाय पर्याय नव्हता. त्यामुळे त्यांनी भारतीय पक्षात प्रवेश करुन निवडणुकीच्या मैदानात उतरण्याचा मार्ग स्वीकारला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत सुजय विखे पाटील यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. सुजय विखे पाटील यांचा भाजप प्रवेश अपेक्षीत होता. विखे पाटील यांच्या पक्षप्रवेशावेळी नगर जिल्ह्यातील हजारो कार्यकर्ते उपस्थित होते. (हेही वाचा, बहुजन वंचित आघाडी 48 जागांवर उमेदवार उभे करणार; काँग्रेससोबत आघाडी नाही: प्रकाश आंबेडकर)

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माढा लोकसभा मतदारसंघातील विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांचे चिरंजीव माजी राज्यसभा सदस्य रणजितसिंह मोहिते पाटील यांनीही गिरिश महाजन यांची भेट घेतल्याची चर्चा आहे. मात्र, महाजन यांनी याविषयी मौन बाळगले आहे. दरम्यान, सुजय विखे पाटील यांचा पक्षप्रवेश करुन भाजपने काँग्रेसला जबरदस्त तडाखा दिला आहे. सुजय यांच्या पक्षप्रवेशानंतर राधाकृष्ण पाटील काय भूमिका घेणार याबाबत उत्सुकता आहे. बहुदा राधाकृष्ण विखे पाटील हे आपल्या विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा देतील अशी चर्चा आहे.