अंशतः पूर्ण झालेला मुंबई-नागपूर सुपर एक्स्प्रेस वे (Mumbai-Nagpur Super Expressway) ‘मृत्यूचा सापळा’ म्हणून उदयास आला आहे. या महामार्गावर 5 महिन्यांपेक्षा कमी कालावधीत 195 मोठ्या आणि लहान अपघातांची नोंद झाली असून, त्यामध्ये तब्बल 95 लोकांचा मृत्यू झाला आहे. तसेच अनेक लोक जखमी झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 11 डिसेंबर 2022 रोजी नागपूर ते नाशिक असा 520 किमीच्या 'हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग' (Hindu HridaySamrat Balasaheb Thackeray Maharashtra Samruddhi Mahamarg) फेज I चे उद्घाटन केले होते.
एकूण नियोजित प्रकल्प 55,000 कोटी खर्चाचा असून, तो महाराष्ट्राची राजधानी मुंबईला उपराजधानी नागपूरशी जोडतो. एकूण 701 किमीचा हा महामार्ग 10 जिल्ह्यांमधून जातो. या महामार्गामुळे दोन शहरांमधील प्रवासाचा वेळ 16 तासांवरून फक्त 8 तासांवर येणार आहे.
आता काउंसिल फॉर प्रोटेक्शन ऑफ राइट्स (CPR) ने म्हटले आहे की, सध्याचा सुरु झालेला मार्ग हा गेल्या पाच महिन्यांपासून वाहने आणि त्यांचा वापर करणाऱ्यांसाठी प्राणघातक ठरला आहे. अधिकृत नोंदीनुसार, महामार्गावर झालेल्या 175 मोठ्या आणि किरकोळ अपघातांमध्ये किमान 95 जणांना आपले प्राण गमवावे लागले आणि शेकडो लोक जखमी झाले आहेत. सीपीआरचे अध्यक्ष, बॅरिस्टर विनोद तिवारी यांनी याबाबत माहिती दिली. (हेही वाचा: Sangli Road Accident: कार आणि ट्रॅव्हल्समध्ये धडक, एकाच कुटुंबातील 4 जण जागीच ठार, एअर बॅग उघडल्याने एकाचा जीव कसाबसा वाचला)
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पोलीस महासंचालक आणि मुख्य सचिव यांचे लक्ष वेधून तिवारी यांनी सुपर एक्स्प्रेस वेवर अपघात/जीवितहानी टाळण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याचे आवाहन केले आहे. विश्वेश्वरय्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (VNIT), नागपूरच्या एका महत्त्वपूर्ण अभ्यासात धक्कादायक खुलासा झाला आहे की, हा सुपर एक्स्प्रेस वेवर पेट्रोल स्टेशन्स, भोजनालये, टॉयलेट, मॉल्स, करमणूक इत्यादी सारखे कोणतेही थांबे दिलेले नाहीत. तिवारी यांनी सांगितले की, पाश्चात्य देशांमध्ये, सर्व महामार्गांवर प्रत्येक 120-125 किमीवर सोयीस्कर थांबे दिले आहेत, जेणेकरून चालकांना सुमारे 120-150 मिनिटे सतत ड्रायव्हिंग केल्यानंतर लहान ब्रेक घेता येईल.
वाहतूक अभियांत्रिकी विभागाच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या व्हीएनआयटी अहवालात असा दावा करण्यात आला आहे की, ब्रेक न लावता बरेच तास वाहन चालवल्यानंतर वाहनचालकांमध्ये ‘महामार्ग संमोहन’ (Highway Hypnosis) विकसित होते ज्यामुळे असे अपघात होतात. थकवा, बरेच तास ड्रायव्हिंग, नीरस महामार्ग, दुर्लक्ष मेंदूची तंद्री यांमुळे असे संमोहन निर्माण होते. सुपर एक्स्प्रेस वेला प्रत्येक दिशेने तीन लेन आहेत, त्यामुळे समोरासमोर टक्कर होण्याची शक्यता कमी आहे, मात्र 50 टक्क्यांहून अधिक ट्रकचालक लेन न बदलण्याच्या नियमांचे पालन करत नाहीत, ज्यामुळे मोठे आणि छोटे अपघात होतात.