महाराष्ट्रात (Maharashtra) सर्व व्यवहार हळूहळू सुरु झाले असताना नागरिकांनी आरोग्य विभागाचे सर्व नियम धाब्यावर बसविल्याने कोरोनाने (Coronavirus) पुन्हा डोके वर काढले आहे. मास्क न घालणे, शारीरिक अंतर न पाळणे, अनाश्यक गर्दी करणे, स्वच्छता न पाळण्याच्या बेफिकिरीमुळे राज्यात दुसऱ्यांदा कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. राज्यात गेल्या काही दिवसांपासून वाढत असलेली रुग्णसंख्या आणि कोरोना प्रसाराचा वेग यामुळे प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे. यातच, कोरोना संदर्भात मुंबई महापालिकेने (BMC) नुकतीच नियमावली जाहीर केली आहे. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात मुंबई महानगरपालिका धडक कारवाई करताना दिसत आहे.
कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी मुंबई महापालिकेने तातडीने पावले उचलली असून, नियम व आदेशाचे पालन न करणाऱ्यांविरुद्ध धडक कारवाई मोहीम सुरू केली आहे. दरम्यान, महापालिकेच्या आदेशाचे उल्लंघन होत असलेल्या वांद्रे परिसरातील तीन रेस्टॉरंट आणि क्लबवर अधिकाऱ्यांनी शनिवारी रात्री अचानक धाडी टाकल्या आहेत. महापालिकेने ठरवून दिलेल्या नियम पायदळी तुडविल जात असल्याचे वांद्रे पश्चिम परिसरातील आयरिश हाऊस पाली हिल, खार येथील यू टर्न स्पोटर्स बार आणि कर्तार पिल्लर बार अॅण्ड रेस्टॉरंट या तिन्ही रेस्टॉरंट व क्लबकडून दंड आकरण्यात आला आहे. या कारावाईत महापालिकेने आयरिश हाऊसकडून 30 हजार, यू टर्न स्पोर्टस बारला 20 हजार कर्तार पिल्लर बार अॅण्ड रेस्टॉरंटला 30 हजार, तर बांद्रा वेस्ट बारला 50 हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. हे देखील वाचा- Coronavirus: राज्यात पुन्हा लॉकडाऊन? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे संध्याकाळी 7 वाजता साधणार जनतेशी संवाद
महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. राज्यातील कोरोनाची संख्या पुन्हा एकदा झपाट्याने वाढ असल्याने प्रशासनापुढे मोठे आव्हान उभे राहिले आहे. यामुळे राज्यात पुन्हा एकदा कडक लॉकडाऊन लागणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यासंदर्भात राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज संध्याकाळी जनतेशी संवाद साधणार आहेत. यावेळी उद्धव ठाकरे नेमकी काय घोषणा करतात? याकडे सर्वसामन्य जनतेचे लक्ष लागले आहे.