धक्कादायक! मुंबईत तब्बल 211 अनधिकृत शाळा; महानगरपालिकेने जाहीर केली नावे
Representational Image (Photo Credits: Wikimedia Commons)

मुंबई महानगर पालिकेच्या (Mumbai Municipal Corporation) शिक्षण मंडळाने (Education Department) पालिका हद्दीतील 211 अनधिकृत शाळांची नावे जाहीर केली आहेत. या शाळा सरकार आणि महानगरपालिकेच्या परवानगी विना सुरु असल्याने त्या ताबडतोब बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्याचबरोबर या अनधिकृत शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांना मुलांना 'या शाळांमध्ये पाठवू नका', असे शिक्षण अधिकाऱ्यांनी पत्र लिहून सूचित केले आहे.

शिक्षण अधिकार कायद्यानुसार, कोणतीही नवीन शाळा सरकार आणि महानगरपालिकेच्या परवानगीशिवाय चालवता येत नाही. त्यामुळे या कायद्याचा भंग करणाऱ्या शालेय व्यवस्थापनाविरुद्ध कठोर कारवाई करण्यात यावी, अशी तरतूद कायद्यात केलेली आहे. तसंच अनधिकृत शाळांची यादी महानगरपालिकेकडून वर्षभराने जाहीर करण्यात येते.

गेल्या वर्षी शिक्षण मंडळाने 231 अनधिकृत शाळांची यादी जाहीर केली होती. यंदा या यादीत 211 शाळांची नावे असून त्यात इंग्रजी माध्यमांच्या शाळांचाही समावेश आहे. अशा अनधिकृत शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना जवळच्या अधिकृत महानगरपालिकेच्या किंवा खाजगी शाळेत प्रवेश मिळवून द्यावा, अशा सूचना शिक्षण मंडळाने या अनधिकृत शाळांना दिल्या आहेत.

या अनधिकृत शाळा मुंबईच्या विविध भागात असून त्यांची संख्या 211 इतकी आहे. जर या शाळांना एप्रिलपर्यंत अधिकृत दर्जा मिळाला तर या बंद होणार नाही. मात्र अधिकृत दर्जा न मिळालेल्या शाळा बंद करण्यात येतील, असे महानगरपालिकेचे अधिकारी महेश पालकर यांनी सांगितले.

अनधिकृत शाळांपैकी काही शाळांची नावे

- मातोश्री शांतादेवी जाधव विद्यामंदिर, अभ्युदयनगर, काळाचौकी.

- सरस्वती विद्यालय, दमुनगर, अकुरेली रोड, कांदिवली पूर्व.

- तुलसीराम रावते प्रा. शाळा, आसाफ, घाटकोपर.

- डॉ. अंबेडकर प्रा. शाळा, वाशिनाका, चेंबूर.

- महाराष्ट्र विद्यालय, महाराष्ट्र नगर, मानखुर्द (पूर्व).

- शिवम विद्यामंदिर, लल्लुभाई कंपाऊंड, देवनार.

- कृष्णाजी कदम विद्यालय, खारदेव नगर, चेंबूर गोवंडी रोड.

- राजीव गांधी विद्यालय, शिवाजीनगर, पार्कसाईट, विक्रोळी पश्चिम.

- फिनिक्स स्कूल, पारसवाडी, घाटकोपर (पश्चिम).

- ज्ञान ज्ञानगर विद्यालय, इंदिरानगर, घाटकोपर (पश्चिम).

- संदेश स्कूल, सूर्यनगर, विक्रोळी (प.).

- नुतन सरस्वती विद्यालय, अमरनगर, खदीपाडा, मुलुंड.

- पांडुरंग शाळा, एलबीएस रोड, मुलुंड (प.).

- महात्मा फुले विद्यालय, संघ नगर, चांदीवली, अंधेरी (पूर्व).

या ठिकाणी आहेत सर्वाधिक अनधिकृत शाळा

गोवंडीत अनधिकृत शाळांची संख्या सर्वाधिक आहे. तसंच अनधिकृत असूनही या शाळा पालकांकडून मोठ्या प्रमाणात फी उकळतात.