सफाई कर्मचारी संपावर गेल्यामुळे राजधानी मुंबईत कचऱ्याचे ढिग साचल्याचे पाहायला मिळत आहे. कचरा उचलणारे सर्वच कामगार संपावर गेल्याने मुंबईतील सर्वच्या सर्व म्हणजेच २४ वॉर्डमध्ये कचऱ्यांचे थरच्या थर लागत आहेत. सफाई कर्मचाऱ्यांच्या संपावर लवकर तोडगा निघाला नाही तर, अल्पावधीतच मुंबईत कचराकोंडी तयार होऊन, सर्वत्र घाण आणि दुर्गंधीचे साम्राज्य पसरलेले पाहालया मिळू शकते.
कचरा उचलण्याच्या कंत्राटवरुन सफाई कर्मचारी आणि महापालिका यांच्यात संघर्ष सुरु आहे. महापालिकेने शहरातील कचरा उचलण्यासाठी नव्या कंपनीला कंत्राट दिले. त्यामुळे सफाई कर्मचाऱ्यांची बदली नव्या वॉर्डात केली जात आहे. महापालिकेच्या या निर्णयामुळे पालिकेकडे कायम आणि कंत्राटी तत्वावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी आहे. ही नाराजी दूर करण्यासाठी किंवा कर्मचाऱ्यांच्या अडचणी पालिकेपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रशासनाला अनेकदा निवेदन देऊनही कोणतही पाऊल उचललं गेलं नाही. त्यामुळे सफाई कर्मचारी चिडले असून, त्यांनी काम बंदचे हत्यार उपसले आहे.(हेही वाचा, मुंबई 'राम भरोसे' - नितेश राणे यांची पाणी कपातीवरून शिवसेनेवर टीका)
सुरुवातीला (गेले दोन दिवस) मुंबईतील कांदीवली, बोरिवली आणि दहिसर आदी परिसरातील सफाई कर्मचारी संपावर होते. मात्र, आता संपूर्ण मुंबईतील (२४ वॉर्ड) कर्मचारी संपावर आहेत.दरम्यान, प्रशासनाने कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर त्वरीत तोडगा काढावा अन्यथा बीएमसीच्या सर्व विभागातील कर्मचारी संपावर जातील, असा इशारा कर्मचाऱ्यांकडून कंपनीला देण्यात आला आहे.