Monsoon 2020 (Photo Credits: IANS)

Monsoon 2020 Update: मुंबई (Mumbai) व उत्तर कोकण भागात येत्या 2 जुलै पासून मुसळधार पावसाचे अंदाज असल्याची माहिती हवामान खात्याचे उपमहासंचालक के. एस. होसाळीकर (K. S. Hosalikar) यांच्यातर्फे देण्यात आली आहे. आयएमडी (IMD) जीएफएस मॉडेल मार्गदर्शनानुसार 2 जुलैपासून उत्तर कोकण आणि मुंबईसह महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवर पाऊस वाढण्याची शक्यता वर्तवणारे ट्विट नुकतेच होसाळीकर यांनी केले आहे. यापूर्वी 28 जून पासून सुद्धा मुंबई व उपनगरात पाऊस होईल असे अंदाज वर्तवण्यात आले होते, मात्र अद्याप अनेक ठिकाणी पाऊस अनुपस्थितच आहे. मुंबईत 11 जून रोजी मान्सूनचे आगमन झाले आहे. त्यानंतर हळूहळू मान्सूनने राज्य व्यापले होते.मात्र आता मागील काही दिवसांपासून पाऊस गायब झाल्याने मुंबईकर पुन्हा एकदा पावसाची वाट पाहत आहेत.

प्राप्त माहितीनुसार, के.एस.होसाळीकर (K S Hosalikar) यांनी शनिवारी सुद्धा मराठवाडा आणि त्याच्या आसपासच्या भागात मुसळधार पाऊस होईल असा अंदाज वर्तवला होता. तर मुंबईत हलक्या मध्यम स्वरुपाच्या सरी बरसण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती.

के. एस. होसाळीकर ट्विट

दरम्यान, ईशान्य भारतात विशेषतः आसाम मध्ये मुसळधार पाऊस बरसल्याने पुराची परिस्थिती निर्माण झाली आहे. सोबतच उत्तर प्रदेशात सुद्धा हवामान खात्याने रेड अलर्ट जारी केला होता. यंदा मान्सून मध्ये सरासरीच्या 100 टक्के पाऊस होणार असल्याचा अंदाज सुरुवातीलाच वर्तवण्यात आला होता.