Mumbai: आमदार Rais Shaikh यांचा राममंदिर उद्घाटनानिमित्त बीएमसी शाळांमधील सांस्कृतिक उपक्रमांना विरोध; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लिहिले पत्र
MLA Rais Shaikh (संग्रहित संपादित प्रतिमा)

समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख (MLA Rais Shaikh) यांनी उत्तर प्रदेशातील अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनानिमित्त बीएमसी (BMC) संचालित शाळांमधील सांस्कृतिक कार्यक्रमांना विरोध केला आहे. शेख यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून हे कार्यक्रम बंद करण्याची मागणी केली आहे. पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या पत्रानंतर बीएमसीने 5 जानेवारीला याबाबत परिपत्रक जारी केले होते.

या परिपत्रकामध्ये नमूद केले होते की, ‘मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीराम जीवन चरित्र' या थीमवर लक्ष केंद्रित करून बीएमसी 10 जानेवारी ते 17 जानेवारी या कालावधीत सांस्कृतिक उपक्रम राबवणार आहे. विद्यार्थ्यांना भगवान रामाच्या विषयाभोवती केंद्रित निबंध लेखन, रेखाचित्र, कविता लेखन आणि नाटक स्पर्धांमध्ये सहभागी होण्याचे निर्देश दिले जातील.’

श्री प्रभू रामचंद्राच्या आदर्श व्यक्तिमत्वाची माहिती विद्यार्थ्यांना व्हावी म्हणून हे कार्यक्रम घेण्यात येत आहेत. आता याला रईस शेख यांनी विरोध दर्शवला आहे. याबाबत त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना एक पत्र लिहिले आहे.

आपल्या पत्रात ते नमूद करतात, ‘बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शाळांतील विद्यार्थ्यांसाठी 9 ते 19 जानेवारी दरम्यान मर्यादापुरोषत्तम प्रभू श्रीराम जीवनचरित्र या विषयांवर निबंध, चित्रकला, कवितालेखन व नाट्यस्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. अशा स्पर्धा घेण्याबाबत मुंबई उपनगर पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिलेल्या निर्देशाला मी कडाडून विरोध केला होता. पालकमंत्री श्री. लोढा यांनी केवळ धार्मिक हेतूने तसेच निवडणुका डोळ्यासमोर ठेवून विद्यार्थ्यांच्या स्पर्धा घेण्याचे प्रशासनाला दिलेले निर्देश बेकायदा आहेत. याव्दारे बृहन्मुंबई महानगरपालिका शाळांचे भगवीकरण करण्याच्या त्यांच्या प्रयत्नांकडे आपले लक्ष वेधले होते.’ (हेही वाचा: Mumbai Festival 2024: येत्या 20 ते 28 जानेवारी दरम्यान ‘मुंबई फेस्टिव्हल 2024’ चे आयोजन; नोव नोंदणी सुरु, जाणून घ्या कुठे कराल रजिस्ट्रेशन)

ते पुढे म्हणतात, ‘बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभगाने या स्पर्धा घेण्याबाबत 5 जानेवारी रोजी परिपत्रक काढले आहे. विशिष्ट धार्मिक हेतू ठेवून विद्यार्थ्यांमध्ये अशा स्पर्धा घेण्यास आमचा कडाडून विरोध आहे. आपण याप्रकरणी हस्तक्षेप करून शाळांचे भगवीकरण आणि धार्मिक ध्रुवीकरण थांबवावे, अशी विनंती करत आहे. महानगरपालिका शाळांमध्ये सर्वधर्मीय विद्यार्थी शिक्षण घेतात. ज्या शिक्षण संस्थेचे प्रशासन राज्य चालवते, अशा संस्थेत धार्मिक शिक्षण- कार्यक्रम - उपक्रम राबवणे ही भारतीय संविधानाची पायमल्ली करण्याचा प्रकार आहे.’