Nitesh Rane: नितेश राणे यांना दिलासा कायम, मात्र अटकेची टांगती तलवार लटकतीच
Nitesh Rane (Photo Credits: PTI)

शिवसैनिक संतोष परब (Santosh Parab Attack Case) हल्ला प्रकरणात नितेश राणे (Nitesh Ran) यांना मुंबई उच्च न्यायालयाने (Bombay High Court) दिलासा कायम ठेवला आहे. कणकवली पोलिसांनीही मुंबई उच्च न्यायालयाकडून निर्णय येत नाही तोपर्यंत नितेश राणे यांच्यावर अटकेसारखी कठोर कारवाई करणार नसल्याची ग्वाही दिली आहे. असे असले तरी नितेश राणे यांच्यावरील अटकेची टांगतील तलवार मात्र कायम आहे. या प्रकरणावर उद्या पुन्हा सुनावणी होणार आहे. आजही या प्रकरणावर दाखल याचिकेबाबत न्यायालयात सुनावणी झाली. मात्र, वेळेअभावी ती तहकूब करण्यात आली. आजची सुनावणी अपूर्ण राहिल्याने उद्या (गुरुवार, 13 जानेवारी) दुपारी एक वाजता पुन्हा सुनावणी होणार आहे.

संतोष परब हल्ला प्रकरणी नितेश राणे यांच्यावर आरोप आहे. या प्रकरणात त्यांना अटक होणार अशी शक्यता वर्तवली जात होती. दरम्यान, अटकपूर्व जामिनासाठी नितेश यांनी स्थानिक न्यायालयाकडे अर्ज केला होता. हा अर्ज फेटाळून लावल्यानंतर नितेश यांनी आपल्या वकीलाकरवी उच्च न्यायालयात दाद मागितली. या अर्जावर पाठिमागील काही दिवसांपासून सुनावणी सुरु आहे. या सुनावणी दरम्यान, नितेश राणे यांच्यावर 7 जानेवारीपर्यंत अटकेसारखी कठोर कारवाई करणार नसल्याची ग्वाही राज्य सरकारने दिली होती. त्यामुळे राणे यांना अटकेपासून संरक्षण मिळाले आहे. दरम्यान, हे प्रकरण अद्यापही न्यायप्रविष्ठ आहे. उद्या या प्रकरणावर कोर्ट अंतिम निर्णय देण्याची शक्यता आहे. (हेही वाचा, Nitesh Rane Anticipatory Bail: नितेश राणे यांना दिलासा, राज्य सरकारकडून कठोर कारवाई न करण्याबाबत हायकोर्टात हमी)

काय आहे प्रकरण?

शिवसेना पदाधिकारी संतोष परब यांना दुचाकीवरुन जात असताना पाठिमागून आलेल्या एका कारने धडक दिली. या धडकेत ते खाली पडले. हीच वेळ साधून त्यातल्या एकाने परब यांच्यावर हल्ला केला. या वेळी त्यांच्यावर चाकूहल्लाही झाला. या प्रकरणात नितेश राणे यांचा हात असल्याचा आरोप आहे. या प्रकरणात चेतन पवार, करण बाळासाहेब कांबळे, अनिल नक्का व करण दत्तू कांबळे यांना अटक झाली आहे. दीपक वाघोडे आणि सचिन सातपुते यांनाही अटक झाली आहे. या हल्ल्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकारणात मोठा गदारोळ माजला होता.