मुंबई उपनगरीय लोकल सेवा सर्वसामान्यांसाठी 1 फेब्रुवारीपासून सुरु होत आहे. तर एकीकडे मुंबई मेट्रोने (Mumbai Metro) देखील आपल्या कामकाजाच्या वेळेत वाढ केली आहे. मेट्रो सेवा वर्सोवापासून (Versova) सकाळी 6.50 मिनिटांनी तर घाटकोपरवरुन (Ghatkopar) सकाळी 7.15 मिनिटांनी सुरु होणार आहे. सध्या मेट्रो सेवा वर्सोवावरुन सकाळी 7.50 ला सुरु होते आणि शेवटची मेट्रो घाटकोपरवरुन रात्री 10.15 ला सुटते. सुमारे 80,000 नागरिक एका दिवसात मेट्रोमधून प्रवास करतात.
नवीन वेळापत्रकानुसार, वर्सोवावरुन पहिली मेट्रो सकाळी 6.50 ला तर घाटकोपरवरुन सकाळी 7.15 ला सुटेल. तर दिवसाची शेवटची मेट्रो ही वर्सोवा वरुन रात्री 9.50 ला तर घाटकोपर वरुन रात्री 10.15 सुटेल. प्रवाशांच्या सोयीसाठी मेट्रो स्टेशनपासून लोकल स्टेशनपर्यंत जाण्यासाठी अंधेरी आणि घाटकोपर येथील फ्लायओव्हर ब्रिज ओपन असतील. यासोबतच अंधेरी पश्चिमेला जावू इच्छिणाऱ्या प्रवाशांसाठी अंधेरी स्टेशनवर एक नवीन गेट खुला करण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवाशांना थेट अंधेरी पश्चिमेकडे जाता येईल. मेट्रो सेवा सुरु होण्याच्या 15 मिनिटांपूर्वी सर्व स्टेशन्स खुली होतील.
दरम्यान, कोरोना व्हायरस लॉकडाऊननंतर मुंबई मेट्रो सर्व्हिस 19 ऑक्टोबर 2020 पासून सर्वांसाठी खुली झाली होती. यासाठी वय आणि लिंग अशी मर्यादा नव्हती. केवळ सुरक्षेच्या नियमांचे पालन करणे बंधनकारक होते. (मुंबई: Versova मेट्रो स्टेशन वर 16 जानेवारीपासून भाड्याने मिळू शकणार सायकल)
कोविड-19 लॉकडाऊनमुळे बंद असलेली लोकल सेवा देखील 1 फेब्रुवारीपासून खुली होत असून त्यासाठी रेल्वे प्रशासनाने जय्यत तयारी सुरु केली आहे. लोकलची संख्या वाढवण्यात आली असून सॅनिटायझेशनसाठी विशेष टीम तयार करण्यात आली आहे. मात्र प्रवाशांना वेळेचे आणि कोरोना संबंधित नियमांचे पालन करणे बंधनकारक असणार आहे. दरम्यान, लोकल सेवा सुरु झाल्याने आणि मेट्रो सेवेचा अवधी वाढवल्याने झाल्याने प्रवाशांचे होणारे हाल कमी होतील, अशी आशा आहे.