Representational Image | (Photo Credits: ANI)

मुंबई मेट्रो लाईन- 3 (Mumbai Metro Line 3)  येथील भोगद्याजवळ काम सुरु असताना मोठा दगड कोसळून एका कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तसेच या प्रकरणी अजून एक कामगार जखमी झाला आहे.

पवई आणि आरे दरम्यान कन्स्ट्रक्शनचे काम सुरु असताना हा प्रकार घडला आहे. तर काम करताना भलामोठा दगड कोसळून त्या ठिकाणी काम करणाऱ्या एका कामगारावर पडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. तसेच त्याच्यासोबत असलेल्या अन्य एका कामगाराला सुद्धा दुखापत झाली असल्याचे मुंबई मेट्रोकडून सांगण्यात आले आहे.या प्रकरणी एएमआरसी कडून अधिक तपास केला जात असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच मेट्रोच्या प्रवक्त्यांनी मृत कामगाराच्या परिवाराला पैशांची मदत करण्यात येईल असे म्हटले आहे.

परंतु मुंबईतील गोरेगाव परिसरातील आरे कॉलनीत मोठ्या प्रमाणात जंगल आहे. महानगरपालिकेच्या हिरव्या फुफ्फुस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोरेगाव येथील आरे कॉलनीतील मेट्रो कार शेडसाठी झाडे तोडण्याच्या प्रस्तावाला बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) वृक्ष प्राधिकरणाने गेल्या आठवड्यात मंजुरी दिली. जेव्हा हा प्रस्ताव पास झाल्यापासून त्याचा कडाडून विरोध केला जात आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही आरे जंगलाचे समर्थन केले होते. त्यांच्या पक्षाचे नगरसेवक कप्तान मलिक यांनी वृक्ष तोडीला समर्थन दिल्यामुळे सुप्रिया सुळे यांनी कप्तान मलिक यांच्याकडे राजीनाम्याची मागणी केली होती. (Aarey कॉलोनी तील 2700 झाडे वाचवण्यासाठी वसीम जाफर याची बॅटिंग, ट्विटरवर पोस्ट शेअर करत केला बीएमसीच्या आदेशाचा विरोध)

त्याचसोबत शिवसेना युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी सुद्धा आरे मधील मेट्रोच्या कारशेड उभारणीसाठी विरोध दर्शवला आहे. तर  नागरीक, बॉलिवूड कलाकार यांनी ही आरे जंगलातील वृक्ष तोडीला विरोध केला आहे. मुंबईतील हे ऐकमेव जंगल आहे. मुंबई शहराच्या अनेक भागातून आरे जंगलातील वृक्ष तोडीला विरोध दर्शवला जात आहे.