
मुंबईमधील (Mumbai) वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्सवरून दाट गर्दीच्या एमआयडीसी मरोळ नाका किंवा विमानतळ टर्मिनल 1 आणि 2 पर्यंत दररोज जवळजवळ सात ते आठ लाख नगरील प्रवास करीत असतात. आता लवकरच या लोकांना दिलासा मिळणार आहे. दक्षिण मुंबईतील कुलाबा/कफ परेड ते बीकेसी ते आरे कॉलनी आणि सिप्झला जोडणारा मेट्रो लाइन 3 किंवा 'अक्वा लाईन' मेट्रो रेल्वे कॉरिडॉरचा बहुप्रतिक्षित पहिला टप्पा (Phase 1 Of Metro Line 3) डिसेंबर किंवा जानेवारीपासून पूर्णपणे कार्यान्वित होण्यासाठी सज्ज झाला आहे.
या भूमिगत नेटवर्कला संपूर्ण मेट्रो रेल्वे प्रकल्पाचा सर्वात महत्त्वाचा कॉरिडॉर मानले जाते, कारण या मार्गावरून दररोज जास्तीत जास्त प्रवासी प्रवास करतात. हा मार्ग सध्याच्या उत्तर-दक्षिण उपनगरीय रेल्वे प्रणालीच्या समांतर चालेल आणि पूर्व-पश्चिम कनेक्टिव्हिटी प्रदान करेल. शिवाय या मार्गामुळे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि बीकेसी, फोर्ट, नरिमन पॉइंट, कफ परेड, लोअर परेल आणि सिप्झ.एमआयडीसी सारखे सहा सेंट्रल बिझनेस डिस्ट्रिक्ट (CBDs) एकमेकांशी जोडले जातील. लवकरच मेट्रो लाईन 3 किंवा एक्वा लाईन ही मुंबईची दुसरी लाईफलाईन बनेल असे, मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन (MMRC) च्या व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे म्हणाल्या.
डिसेंबर-जानेवारीमध्ये सुरू होणार्या प्रस्तावित पहिल्या टप्प्यात खालील स्थानके समाविष्ट असतील- सिप्झ, आरे कॉलनी, एमआयडीसी, मरोळ नाका, सहार रोड, देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमानतळ, सांताक्रूझ, विद्यानगर आणि बीकेसी.
जुलै 2024 मध्ये सुरू होणारा दुसरा टप्पा कफ परेड, नरिमन पॉइंट, चर्चगेट, हुतात्मा चौक, सीएसटी, काळबादेवी, गिरगाव, ग्रँट रोड, महालक्ष्मी, वरळी, दादर आणि शितलादेवी अशा अत्यंत गर्दीच्या परिसरातील 17 स्थानकांवरून जाईल. (हेही वाचा: 'जितक्या वेगाने महाराष्ट्राचा विकास होईल तितक्या वेगाने भारताचा विकास होईल'; PM Narendra Modi यांनी राज्यात केली 7500 कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांची पायाभरणी)
दरम्यान, 33.5 किलोमीटर पेक्षा जास्त पसरलेल्या या नवीन पूर्णपणे भूमिगत एक्वा मेट्रो लाईन कॉरिडॉरमुळे मुंबईच्या रस्त्यांवरील वाहतूक आणि गर्दी 35 टक्क्यांनी कमी होण्याची अपेक्षा आहे. यामुळे जवळपास 6.5 लाख वाहने बंद होतील आणि इंधनाचा वापर दररोज 3.5 लाख लिटरने कमी होईल. क्लिष्टता, विशालता, तीव्रता आणि वापराच्या बाबतीत हा मेट्रो कॉरिडॉर अतुलनीय ठरेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे.