मुंबई: कुलाबा-वांद्रे-सीप्झ या मेट्रो 3 च्या मार्गाचे आझाद मैदान ते मुंबई सेंट्रल स्टेशनपर्यंतचे भुयारीकरण पूर्ण
Mumbai Metro 3 (Photo Credits: Twitter)

कुलाबा-वांद्रे-सीप्झ या मेट्रो 3 च्या पहिल्या भुयारी मार्गाचे भुयारीकरण आज पूर्ण झाले. या मार्गात आझाद मैदान ते मुंबई सेंट्रल असे 3.814 किमीचे भुयारीकरण पूर्ण करण्यात आले. 4 डिसेंबर 2017 पासून सुरु करण्यात आलेले हे काम 20 महिन्यांच्या कालावधीत पूर्ण करण्यात आले असून त्यासाठी वैतारणा-1 या टनेल बोअरिंग मशीनचा वापर करण्यात आला. तसंच जमिनीच्या 20 मीटर खाली कठीण दगड छेदत मार्ग काढण्याचे काम करण्यात मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनला यश आले आहे. यासाठी 2720 सेगमेंट रिंग्सचा वापर करण्यात आला.

मेट्रो 3 चे काम अतिशय जलद आणि वेळेत होत आहे. यासाठी वापरण्यात आलेली वैतरणा-1 मशीनच्या मार्गात 14 उंच इमारती, 28 ऐतिहासिक वास्तू आणि जुन्या इमारतींचा समावेश होता. तरी देखील सुरक्षिततेची काळजी घेऊन हे भुयारीकरणाचे कार्य वेळेत पूर्ण करण्यात आले. 'मेट्रो-3 'च्या मार्गातील हा 15 वा ‘ब्रेक थ्रु’ आहे.

Mumbai Metro 3 ट्विट:

भुयारीकरणाचे कार्य अतिशय आव्हानात्मक असून ते वेळेत पूर्णत्वास नेल्याने आमचा आत्मविश्वास वाढला असल्याचे मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालिका अश्विनी भिडे यांनी सांगितले.

Mumbai Metro 3 ट्विट:

या कार्यक्रमात राज्याचे मुख्य सचिव अजॉय मेहता, पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक, पश्चिम रेल्वेचे जनरल मॅनेजर ए. के. गुप्ता यांच्यासह मेट्रो रेल कॉर्पोरेशनचे अधिकारी उपस्थित होते.