मुंबईमधील (Mumbai) बहुप्रतीक्षित मेट्रो मार्ग 9 (दहिसर पूर्व ते मीरा भाईंदर) आणि मेट्रो मार्ग 7A (अंधेरी पूर्व ते छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय टर्मिनल) यांना कार्यान्वित होण्यासाठी लक्षणीय विलंब झाला आहे. मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन डेव्हलपमेंट ॲथॉरिटी (MMRDA) च्या अलीकडील अपडेट्समधून ही बाब समोर आली आहे. या दोन्ही मार्गावरील सेवा मूळतः सप्टेंबर 2022 आणि मार्च 2023 पर्यंत कार्यान्वित होण्याची अपेक्षा होती, मात्र प्रकल्पांना नवीन मुदत देण्यात आली आहे. अहवालानुसार, आता मार्ग 9 साठी जून 2025 आणि मार्ग 7A साठी जुलै 2026 ची नवी मुदत ठरवण्यात आली आहे.
कार्यकर्ता अनिल गलगली यांनी दाखल केलेल्या माहितीच्या अधिकाराच्या (आरटीआय) प्रश्नानंतर सुधारित टाइमलाइन उघडकीस आल्या. मेट्रो प्रकल्प अंमलबजावणी शाखेचे कार्यकारी अभियंता सचिन कोठावळे यांनी दिलेल्या प्रतिक्रियेत, दोन्ही मार्गांना महत्त्वपूर्ण मुदतवाढ आवश्यक असलेल्या अडचणींचा सामना करावा लागल्याची पुष्टी करण्यात आली.
गलगली यांनी विलंबावर टीका केली व वाढीव खर्च आणि अकार्यक्षमता या प्रमुख समस्या असल्याचे ते म्हणाले. महत्त्वाकांक्षी पायाभूत सुविधा प्रकल्पांना होणारा विलंब हा प्रकल्प खर्च वाढवतो, यासह नागरिकांना वेळेवर सुविधांपासून वंचित ठेवतो. जनतेच्या कराचा पैसा वाया जात असून, विलंबाबाबत कंत्राटदारांवर कठोर कारवाई आवश्यक आहे. त्यांना काळ्या यादीत टाकणे आणि दंडात्मक उपायांचा विचार केला पाहिजे, असे ते म्हणाले. (हेही वाचा: Mumbai Metro Update: मुंबईत मेट्रो लाइन 3 च्या कामाला वेग; MMRC च्या MD अश्विनी भिडे यांनी केली वरळी आणि आचार्य अत्रे चौक स्थानकांची पाहणी)
दोन्ही मेट्रो कॉरिडॉरसाठी 9 सप्टेंबर 2019 रोजी कार्यादेश जारी करण्यात आले होते. प्रारंभिक आशावाद असूनही, बांधकाम आव्हाने आणि इतर अडथळ्यांमुळे प्रकल्पाची प्रगती मंदावली आहे. या मार्गांवर विसंबून राहणाऱ्या प्रवाशांना आता मुंबईतील वाहतूक कोंडीतून सुटका मिळण्यासाठी आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे. एमएमआरडीएच्या प्रकल्पाला वारंवार होत असलेल्या विलंबामुळे मुंबईच्या मेट्रो विस्ताराचे नियोजन, अंमलबजावणी आणि जबाबदारी यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दरम्यान, मेट्रो मार्ग 9 चे उद्दिष्ट दहिसर पूर्वेला मीरा भाईंदरशी जोडून, पश्चिम उपनगरे आणि मुंबईच्या उत्तरेकडील प्रदेशांमधील प्रवासी प्रवाह सुलभ करणे हे आहे. तर मेट्रो मार्ग 7A अंधेरी पूर्व ते आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रवेश प्रदान करेल.