![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2023/03/Mumbai-local-380x214-1.jpg)
मुंबईत पश्चिम रेल्वेने (Mumbai Local) मंगळवारी मध्यरात्री 1:10 ते उद्या बुधवारी पहाटे 4:40 पर्यंत विशेष ब्लॉक (Mega Block) घोषित केला आहे. अंधेरी येथील गोपाळ कृष्ण गोखले रेल्वे उड्डाणपुलाच्या कामांसाठी हा ब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉकदरम्यान लोकलच्या अनेक फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. रेल्वेने अचानक पश्चिम मार्गावर ब्लॉक घोषित केल्याने रात्री उशीरा आणि पहाटे कामावर निघणाऱ्या चाकरमान्यांचा खोळंबा होण्याची शक्यता आहे. या मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी वेळापत्रक पाहूनच नियोजन करावं, असं आवाहन रेल्वे प्रशासनाच्या वतीने सध्या करण्यात आले आहे. (हेही वाचा - Local Train Services Disrupted: दुरुस्तीच्या कामामुळे कर्जत-बदलापूर दरम्यानची लोकल ट्रेन सेवा विस्कळीत)
मुंबईत अंधेरीस्थित गोपाळ कृष्ण गोखले रेल्वे उड्डाणपुलाचं काम मंगळवारपासून सुरू होणार आहे. या कामासाठी पश्चिम रेल्वेवरील पाचव्या-सहाव्या मार्गावर ब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉकमुळे विरार येथून अंधेरीसाठी रात्री 10.18 वाजता सुटणारी लोकल रद्द करण्यात आली आहे. तर वसई रोड ते अंधेरी रात्री 11.15 वाजेची लोकल रद्द करण्यात आली आहे. याशिवाय चर्चगेट-विलेपार्ले मध्यरात्री 12.30 वाजता सुटणाऱ्या लोकलची फेरी देखील रद्द करण्यात आली आहे.
बुधवारी पहाटे 4.25 वाजून सुटणारी अंधेरी ते विरार, पहाटे 4.05 वांद्रे-बोरिवली, बोरिवली-चर्चगेट, अंधेरी-विरार आणि पहाटे 4.05 वाजता सुटणाऱ्या अंधेरी-चर्चगेट लोकलच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत.