Mumbai Mega Block:  मध्य रेल्वे कडून 63 तासांच्या मेगा ब्लॉकची घोषणा; 900 हून अधिक लोकल, 72 एक्सप्रेस गाड्या रद्द करण्यात येणार, जाणून घ्या सविस्तर
Mumbai Local | (File Image)

Mumbai Mega Block: मुंबईमध्ये लोकल रेल्वेने (Mumbai Local Train) प्रवास करणाऱ्या लोकांसाठी महत्वाची माहिती आहे. प्लॅटफॉर्म विस्तारीकरण आणि यार्ड नूतनीकरणाच्या कामासाठी, मध्य रेल्वे 63 तासांचा ब्लॉक (Mumbai Mega Block) घेणार आहे.  यामध्ये सीएसएमटी स्थानकांत शनिवार, 1 जून 2024 आणि रविवार, 2 जून 2024 रोजी हा ब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे तब्बल 930 उपनगरीय लोकल गाड्या आणि 72 मेल एक्सप्रेस गाड्या प्रभावित होणार आहेत. यासह मध्य रेल्वे प्लॅटफॉर्म क्रमांक 5 आणि 6 वर विस्तारीकरणाचे काम करण्यासाठी ठाणे स्थानकावर गुरुवार मध्यरात्रीपासून 63 तासांचा मेगाब्लॉक घेणार आहे.

सीएसएमटी येथे शनिवारी, 1 जून रोजी मध्यरात्रीनंतर ब्लॉक सुरू होईल आणि या ब्लॉकदरम्यान सीएसएमटी ते भायखळा मुख्य मार्गावर आणि हार्बर मार्गावरील सीएसएमटी ते वडाळा रोडपर्यंतची लोकल सेवा पूर्णपणे रद्द केली जाईल. मध्य रेल्वेचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक, रजनीश कुमार गोयल यांनी ही माहिती दिली.

ठाणे येथे ब्लॉक गुरुवार मध्यरात्रीनंतर सुरू होईल. मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी स्वप्नील निला यांनी पीटीआयच्या वृत्तानुसार पुष्टी केली की, मुख्य आणि हार्बर मार्गावरील 72 मेल/एक्स्प्रेस गाड्या आणि 956 मुंबई लोकल गाड्या शुक्रवार ते रविवार या कालावधीत रद्द केल्या जातील. वडाळा, दादर, पुणे, पनवेल आणि नाशिक येथून अनेक मेल/एक्स्प्रेस आणि मुंबई लोकल गाड्या शॉर्ट टर्मिनेटेड आणि शॉर्ट-रूट केल्या जातील. (हेही वाचा: Palghar Train Derailment: पालघरमध्ये मालगाडीचे डब्बे रुळावरून घसरले; पश्चिम रेल्वेच्या वाहतूकीवर परिणाम, अनेक लोकल रद्द)

रेल्वेने प्रवाशांना आवाहन केले आहे की, ब्लॉक कालावधीमध्ये आवश्यक नसल्यास लोकल ट्रेनमध्ये प्रवास करणे टाळा. रेल्वेने याकाळात बृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रान्सपोर्ट (BEST) आणि महाराष्ट्र स्टेट रोड ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन (MSRTC) यांना प्रवाशांच्या सोयीसाठी जादा बसेस चालवण्यास सांगितले आहे. दरम्यान, सीएसएमटी हे देशातील सर्वात व्यस्त रेल्वे टर्मिनसपैकी एक मानले जाते. मुंबईत मध्य रेल्वेचा मुख्य मार्ग आणि हार्बर मार्गावर जवळपास 1,810 लोकल गाड्या धावतात. त्यापैकी 1,299 हून अधिक सीएसएमटीमध्ये आणि तेथून ऑपरेट केल्या जातात. मध्य रेल्वेने सध्या मेल एक्सप्रेस गाड्यांचे प्लॅटफॉर्म विस्तारण्याचे काम हाती घेतले आहे.